अट्टल महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न तज्ञांनी मांडले वस्तुनिष्ठ आणि प्रासंगिक विचार

अट्टल महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न तज्ञांनी मांडले वस्तुनिष्ठ आणि प्रासंगिक विचार
गेवराई/प्रतिनिधी
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. सदरील वेबिनारमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून विश्व भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन पश्चिम बंगाल येथून प्रा. सुमेध रणवीर यांनी विविध वस्तुनिष्ठ संदर्भातून "कोरोना नंतरची मराठी भाषा आणि साहित्याची स्थिती" याविषयी मांडणी केली. अशा महामारीचा समाजावर आणि पर्यायाने त्या समाजाच्या भाषा साहित्य व संस्कृतीवर दूरगामी परिणाम होतो. अशा विविध महामारीचा इतिहासाचा आढावा घेत त्याचे साहित्यातील, चित्रपटातील, नाटकातील प्रतिबिंब उलगडून सांगत सद्यस्थितीतील मराठी भाषा आणि साहित्याची पुनर्रचना यासंदर्भात प्रा. सुमेध रणवीर यांनी मार्गदर्शन केले. अलिगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेश येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. ताहेर पठाण यांनी लॉकडाऊन आणि लॉकऑन या संदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य करत कोरोनाच्या प्रभावातून निर्माण होणारे लोकसाहित्य, कोरोनामुळे भाषा आणि साहित्यावर झालेला परिणाम स्पष्ट केला. त्यांच्या मुद्देसूद आणि भविष्याची तळमळ असणाऱ्या चिंतनातून महत्वपूर्ण संदेश दिला गेला. तर वेबिनारचे अध्यक्ष, सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब राठोड यांनी लोकसाहित्याच्या अनेक पाऊलखुणांमध्ये अशा प्रकारच्या संकटांचे ठसे कसे उमटलेले आहेत याचे संदर्भांसह मार्गदर्शन केले. भविष्यातील भाषिकनियोजन आणि कोरोनाचा अनाठाई बागुलबुवा याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. वेबिनारचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनातून झाले. मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ समाधान इंगळे यांनी वेबिनारच्या सुरुवातीला प्रास्ताविक केले आणि पाहुण्यांचा परिचय दिला. समाज माध्यमांना शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी उपयोगात आणणे महत्त्वाचे असल्याचे सांगून अशाप्रकारे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वेबिनारचा प्रयोग आपण करत आहोत, असे त्यांनी सांगितले. तर मराठी विभाग प्रमुख व वेबिनारचे संयोजक डॉ.संदीप बनसोडे यांनी आभार मानले. विशेष म्हणजे या संपूर्ण वेबिनारचे सहा व्हिडीओ अट्टल महाविद्यालयाच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत, यानंतरही विद्यार्थी व अभ्यासकांनी फेसबुक पेजला भेट देऊन सदरील वेबिनार ऐकण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले. देशभरातील विविध ठिकाणाहून अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक विद्यार्थी यांनी वेबिनारमध्ये मोठ्यासंख्येने उपस्थिती दर्शविली. सर्व उपस्थित सहभागींनी वेबिनारच्या यशस्वीते बद्दल प्रतिक्रिया दिल्या. या सर्व प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरील व्हिडिओच्या संदेश बॉक्समध्ये आपणास वाचायला मिळतील. वेबिनारच्या यशस्वितेसाठी प्रा. शरद सदाफुले, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रा. राजेंद्र बरकसे, प्रा. सुहास मचे, प्रा. करुणा पटेल, सुदर्शन निकम यांनी सहकार्य केले.
