खडकत येथे झेंड्याच्या वादातून तणाव; 45 आरोपी निष्पन्न, 23 जणांना अटक

Beed

खडकत येथे झेंड्याच्या वादातून तणाव; 45 आरोपी निष्पन्न, 23 जणांना अटक

खडकत /प्रतिनिधी 

खडकत येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या वादाची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी दोन्ही समाजातील लोक लाठ्या-काठ्या घेऊन एकत्र जमले होते. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटांनी पोलिसांचा सल्ला न मानता एकमेकांवर दगडफेक आणि लाठीकाठ्यांनी मारहाण सुरू केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला. पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

पोलीस शिपाई सद्दाम शेख यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांवर भारतीय दंड संहिता कलम 109 (1), 110, 115(2), 118(1), 125, 223, 324(2), 189(2), 189(3), 191(2), 191(3), 190, 192, 352, 351 (2), 351(3) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आतापर्यंत 45 आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यातील 23 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नागरिकांना विनाकारण कायदा हातात न घेण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायदा तोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, भार्गव सपकाळ, मंगेश साळवे, महादेव ढाकणे यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सध्या परिसरात शांतता आहे.

Sharing

Visitor Counter