बीड, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

बीड, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई
बीड प्रतिनीधी
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी MCOCA, MPDA, तसेच कलम 55, 56, 57 मपोका अंतर्गत अनेक गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे.
दि. 16 जानेवारी 2025 रोजी, फिर्यादी चिब्बा आजिनाथ भोसले (रा. हतोळण, ता. आष्टी) यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीचे दिर कृष्णा भोसले दर्शनासाठी मोहटादेवी येथे गेले असता गोरख भोसले व साथीदारांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचे पती अजिनाथ भोसले व दुसरे दिर भरत भोसले मोटारसायकलवर घटनास्थळी पोहोचले, मात्र ते परत आले नाहीत.
कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी गेल्यावर वाहीरा-पिंपळगाव रस्त्याच्या कडेला भरत भोसले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर अजिनाथ भोसले अचेतन अवस्थेत आढळले. कृष्णा भोसले गंभीर जखमी अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अजिनाथ व भरत भोसले यांना मृत घोषित केले.या हल्ल्यासाठी गोरख नारायण भोसले व इतर 09 साथीदारांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून लोखंडी पाईप, कुऱ्हाड, चाकू यासारख्या घातक शस्त्रांनी मारहाण केली, असे जखमी कृष्णा भोसले यांनी सांगितले.
अंभोरा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले (रा. वाहीरा, वय 35 वर्षे) याला दि. 21 जानेवारी 2025 रोजी अटक केली. तसेच खालील पाच आरोपींनाही अटक करण्यात आली:
1. सोमीनाथ ऊर्फ नाज्या काळे (वय 35, रा. घु. पिंपरी)
2. मुद्दसर मन्सूर पठाण (वय 38, रा. कानडी खुर्द)
3. सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले (वय 40, रा. वाहीरा)
4. शशिकला दीपक भोसले (वय 35, रा. वाहीरा)
5. संध्या कोहीनूर भोसले (वय 21, रा. वाहीरा)
सध्या तीन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.भविष्यातही शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर MCOCA व MPDA कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील हे करीत असून, उर्वरित फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोटनी मंगेश साळवे, पो.नि. उस्मान शेख, स्थागुशा बीड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
गुन्हेगारी टोळीवर मोक्कांतर्गत कठोर कारवाई
पोलिसांच्या तपासात ही टोळी बीड, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यात 13 हून अधिक गुन्ह्यांत सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावा नष्ट करणे, रस्ता अडवणे, मारहाण, खंडणी मागणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोटनी मंगेश साळवे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत प्रस्ताव तयार करून दि. 10 मार्च 2025 रोजी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विरेंद्र मिश्र (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) यांनी दि. 19 मार्च 2025 रोजी मोक्का कायद्याच्या कलम 3(1), 3(2) आणि 3(4) अंतर्गत कारवाईस मान्यता दिली.








