"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.सुरेश धस रस्त्यावर"

"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.सुरेश धस रस्त्यावर"
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी विशेष काळजी म्हणून सतर्क राहणे गरजेचे आहे.परिणामी आष्टी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हि बाब चिंताजनक असून विनाकारण बाजारात गर्दी होत असल्याचे चिञ आहे.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये त्यामुळे सद्यपरिस्थिती बघता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आ.सुरेश धस हे स्वतः शहरात रस्त्यावर उतरल्याचे चिञ गुरुवारी दिसून आले.
आ.धस यांनी गुरवारी दि.23 रोजी बाजारात जाऊन कोविड-19 च्या दिशानिर्देशांचे पालन होते किंवा नाही याचा आढावा घेत व्यापार पेठेत येऊन नगर पंचायतच्या निर्देशानुसार दुकाने सुरू करण्यासंदर्भातील काही नियम आहेत.मात्र, हे नियमही पाळले जात नाहीत.दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे,मास्कचा वापर करावा व या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे.त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहेत.दुचाकींवर टिबल सीट काही व्यक्ती तर चारचाकी वाहनातून पाच-पाच व्यक्ती फिरत आहेत.परिणामी शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नका,अनावश्यक गर्दी टाळा तसेच मास्कचा वापर आणि सातत्याने हात स्वच्छ ठेवण्याचे काम नागरिकांनी करण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
