तागडगाव येथे वेठबिगारीत अडकलेल्या बालकांची व कामगारांची सुटका 

Beed

तागडगाव येथे वेठबिगारीत अडकलेल्या बालकांची व कामगारांची सुटका 

जिल्हा प्रशासन व विधी सेवा प्राधिकरणाचे संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन

बीड प्रतिनिधी 

समाजाला हादरवून टाकणारी एक गंभीर घटना शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथे उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातून पाच वर्षांपूर्वी कामासाठी आलेल्या काही मजुरांना वेठबिगारीच्या जाळ्यात अडकवून ठेवण्यात आले होते. त्यांनी सुरुवातीला फक्त पाच ते दहा हजार रुपयांची उचल घेतली होती, मात्र ती संपल्यानंतरही त्यांना परत जाऊ देण्यात आले नाही. उलट वापस जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण केली जात होती आणि तीन-चार कोयत्यांच्या धाकावर सतत धमकावले जात होते.

या मजुरांपैकी एकाने संधी साधून पालघर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला या अमानवीय परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्या कार्यकर्त्याने बीड जिल्ह्यातील ‘अधिकार मित्र’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याशी संपर्क साधला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता कांबळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी बीड यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.

बॉण्डेड लेबर (वेठबिगार) प्रकरण म्हणून ओळखल्या गेलेल्या या घटनेची बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गंभीर दखल घेऊन महसूल, पोलीस, महिला व बालविकास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व असंघटित कामगार सेलच्या संयुक्त टीमसह तागडगाव येथे रेस्क्यू ऑपरेशन राबविले.

या मोहिमेतून दहा बालके आणि दोन प्रौढ व्यक्तींची यशस्वी सुटका करण्यात आली. या प्रकरणात शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील तीन व पाथर्डी तालुक्यातील एक अशा चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143(5), 127(4), 351(2), 3(5), बंदविगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 कलम 16, 17, 18, बालकामगार (प्रतिबंध व विनियमन) अधिनियम 1986 कलम 14, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 कलम 75 व 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या कुटुंबीयांमध्ये ११ वर्षांची एक मुलगी तब्बल दीड वर्षापासून एका आरोपीच्या घरी गुरे चारणे आणि घरगुती काम करत होती.दुसरी मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून दुसऱ्या आरोपीकडे जबरदस्तीने काम करत होती.तिसरी मुलगी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कामासाठी घेऊन गेली होती.

सर्व बालकांची आणि कामगारांची सुरक्षित सुटका केल्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. त्यांनी या बालकांशी घडलेल्या अत्याचारांविषयी जाणून घेतले आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ आदेश दिले.ही संपूर्ण कारवाई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. आनंद यावलकर तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि सचिव डब्ल्यू. ए. सय्यद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार चे तहसीलदार सुरेश घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, संरक्षण अधिकारी अनिता कदम, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य तत्वशील कांबळे, अॅड. बडे तसेच असंघटित कामगार सेलच्या समन्वयाने पार पडली.ही कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून मानवतेसाठीची एक संवेदनशील लढाई असल्याचे मानले जात आहे.

Sharing

Visitor Counter