बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, प्रशासन सतर्क

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, प्रशासन सतर्क
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे_ जिल्हाधिकारी
बीड प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात २१ ते २२ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या, नाले व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ४८.४ मिमी इतके नोंदले गेले असून, आतापर्यंतच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान १२५.६% इतके झाले आहे.बीड जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली असून, अनेक ठिकाणी विसर्ग सुरू आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन सतर्क असून, एनडीआरएफ पथके कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
धरणांची स्थिती :_जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे शंभर टक्के भरली असून, माजलगाव प्रकल्प ९६.६७% क्षमतेपर्यंत भरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पूरस्थिती व स्थलांतर :_शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा, देववडवाडी, शिरसाळा येथे दरम्यानचे पूल वाहून गेले आहेत.पाटोदा तालुक्यातील परगाव, धुमरा व आसपासच्या ७० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध ठिकाणी २४ तासात एनडीआरएफ पथकाच्या मदतीने नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
जीवितहानी :_शिरूर कासार तालुक्यात पूरपाण्याच्या प्रवाहात वाहून २ बैल, १० मेंढ्या, ४ वकऱ्या व १ जनावर मृत्यूमुखी पडले आहेत.
पूरग्रस्त घरे:_शिरूर कासार तालुक्यात १ घर व बीड तालुक्यात १ घर पूरपाण्यामुळे कोसळले आहे.
प्रशासनाचे आवाहन:_जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्त व धोकादायक भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.








