त्रिमूर्तीच्या संगतीने बदलाची नवी पहाट..!

त्रिमूर्तीच्या संगतीने बदलाची नवी पहाट..!
बीड जिल्हा हा अनेक चढ-उतारांचा साक्षीदार आहे. येथे अनेक अधिकारी आले, गेले. कुणी चांगली कामे करून आपला ठसा उमटवला, तर कुणी केवळ औपचारिकता पूर्ण करून निघून गेले. मात्र, आज पहिल्यांदाच जिल्ह्यातील तीन मान्यवर अधिकारी मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान आणि मा. पोलिस अधीक्षक नवनीत कावत, यांनी खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे समाजाला एक अनमोल संदेश दिला आहे.
हे चित्र केवळ एका क्षणाचे नव्हते, तर एका विचाराचे प्रतीक होते. कायदा हा सर्वांसाठी समान आहे, न्याय हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि प्रशासन हे लोकांसाठीच आहे या तत्त्वांची आठवण त्यांनी नागरिकांना करून दिली.
बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथल्या हजारो कुटुंबांना पिढ्यानपिढ्या मजुरीवरच आपले आयुष्य घालवावे लागले आहे. शिक्षणाच्या अभावामुळे या जिल्ह्याने बरंच सहन केलं. पण आता काळ बदलतोय. तरुणाई शिक्षणाकडे वाटचाल करत आहे. अशा वेळी प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनाची साथ मिळाली, तर बीड जिल्हा नक्कीच प्रगतीच्या दिशेने झेप घेईल, याबाबत शंका नाही.
आज गणेश विसर्जनाच्या निमित्ताने या तिघांनी "त्रिमूर्ती"प्रमाणे एकत्र येऊन साजरा केलेला क्षण म्हणजे सामूहिकता, एकता आणि जबाबदारीचे जिवंत उदाहरण होते. हा संदेश समाजात अतिशय सकारात्मकतेने पोहोचला आहे.
राजकीय दबाव, व्यक्तिस्वार्थ आणि जुनी चालीरीती यांच्या छायेत जिल्ह्याची बदनामी होत होती. पण आता परिस्थिती बदलताना दिसते आहे. कायद्याच्या चौकटीत, निर्भीडपणे आणि पारदर्शकतेने काम केल्यास हा जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक आदर्श जिल्हा ठरेल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे.
बीड जिल्ह्याची ओळख बदलण्याची ताकद या तिघांच्या हातात आहे. नागरिकांच्या मनात एक नवीन आशा जागवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. बीड जिल्ह्याला नवी दिशा, नवा श्वास आणि नवे आयाम मिळावेत, हीच अपेक्षा..!
काझी समीरोद्दिन
मो.9049904996








