गुटख्याच्या साठ्यावर बीड पोलिसांचा मोठा छापा; 9.28 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटख्याच्या साठ्यावर बीड पोलिसांचा मोठा छापा; 9.28 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड प्रतिनिधी
बीड शहरातील पेठ बीड भागात VIP लॉन्ससमोर, बीड-परळी रोडवरील एका गोडाऊनमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काल (दि. 30 एप्रिल 2025) मोठी कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसुदन घुगे यांच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. सदर पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित गोडाऊनची झडती घेतली असता, एका अर्धवट बांधकाम असलेल्या बंद गोडाऊनमध्ये 35 गोण्यांमध्ये गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 9,28,500/- रुपये इतकी आहे.या प्रकरणी पो.ह. 690 शेख नासीर शेख बशीर यांच्या फिर्यादीवरून शेख इकबाल आणि शेख जावेद उर्फ बब्बू (रा. बीड) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पेठबीड येथे गु.र.नं. 124/2025 अन्वये भारतीय दंड विधान कलम 123, 274, 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसुदन घुगे, पो.ह. 1682 शरद बहीरवाळ, पो.ह. 148 धनंजय गायकवाड, पोशि. 887 अविनाश सानप, पोशि. 407 कुलदीप गुंजाळ यांनी संयुक्तपणे केली.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अवैध धंद्यांविषयी किंवा अन्य गोपनीय माहिती असल्यास ‘संवाद प्रकल्प’चा QR कोड स्कॅन करून तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
