बीड न.प.मध्ये नवीनच घोटाळा?

बीड न.प.मध्ये नवीनच घोटाळा?
स्वच्छता निरीक्षक गायकवाडाने केले दंडाचे 9 पुस्तके गायब
बीड/प्रतिनिधी
अनागोंदी कारभाराचा कळस म्हणून बिहारची ओळख संपुर्ण देशभरात आहे. तसेच महाराष्ट्रातील बिहार म्हणून बीडची नकोशी ओळख निर्माण करण्यामध्ये राजकिय नेते, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते, गुटख्यापासून मटक्यापर्यंतचे माफिया, त्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा आणि या सर्वांचे ‘गुरु’ म्हणवून घेण्याची योग्यता असलेले प्रशासकिय कर्मचारी, अधिकारी या सगळ्यांचे महत्वाचे योगदान आहे. कोणतीही नियमबाह्य गोष्ट करण्यासाठी वरदहस्त लागतो तो सरकारी बाबुंचाच.लिगलला इनलिगल आणि इनलिगलला लिगल करण्यात त्यांनी पीएचडी मिळवलेली असते. कमी कामात जास्तीत जास्त मलिदा कसा खायचा हे जर शिकायचे असेल तर सरकारी अधिकार्यांकडूनच. हे सर्व करत असताना जनतेला वार्यावर सोडून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे उद्योग बीड मध्ये सर्वात जास्त कोण करत असतील तर ते म्हणजे बीड नगर पालिकेचे कर्मचारी.नगर पालिकेतील एका महादेव गायकवाड नामक कर्मचार्याने कोविड काळात सर्वसामान्यांना दंड करण्याची जी मूभा भेटली होती त्याचा गैरफायदा घेत 9 पावती बुके फाडून लोकांकडून लाखो रुपयांचा दंड वसुल केलेला आहे. कहर म्हणजे ही सर्व पावती बुके ही नगरपालिकेत जमा न करता, त्या दंडाची रक्कम ही गायब करण्यात गायकवाडाला यश आल्याची चर्चा नगर पालिकेच्या परिसरात असून गायकवाडला तात्काळ निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद/नगर पंचायत/महापालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक के.के.आंधळे यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळ कुणाला जीव घेणारा तर कुणाला लखपती बनवणारा ठरलेला आहे. बीड नगर पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी कोविडचे नियम पालन करणार्यांसाठी दंडात्मक कारवाई सुरु केली होती. सदरील दंड वसुल करण्याचे काम हे स्वच्छता विभागातील कर्मचार्यांकडे सोपवले होते. सफाई कामगार असलेल्या एका महादेव गायकवाड या कर्मचार्याने तब्बल 9 दंड वसुलीचे पावती बुके गायब करुन लाखो रुपयांचा मलिदा खाल्ला आहे.
सफाई कामगार कसा झाला स्वच्छता निरीक्षक
बीड न.प.मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या महादेव गायकवाडला कोणी स्वच्छता निरीक्षक केले? हा प्रश्न आज विचारला जात आहे. लोकांकडून पैसे गोळा करुन स्वत:चा टोलेजंग अशा शेडचा पसारा वाढवणार्यावर कधी कारवाई होणार? याबद्दल जनताच प्रश्न विचारु लागली आहे.
