जलजीवन योजनेचा लाभ कुणाला?

जलजीवन योजनेचा लाभ कुणाला?
बीड/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुरू असलेल्या ग्रामीण जलजीवन योजनेचे पाणी पुढाऱ्यांनीच वाटून घेतल्याचे दिसत असून ज्या गावात ज्या पक्षाची ग्रामपंचायत त्या गावात त्या पक्षाच्या गुत्तेदाराला काम हा नियम लागू झाल्यामुळे जलजीवन योजनेत गुत्तेदारांचंच जीवन उंचवणार असल्याचं यामुळे दिसू लागलं आहे . पावसाळ्याच्या तोंडावर कसे बसे काम उरकून घेण्याची प्रयत्न सुरू असताना नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे स्पष्टपणे जानवते . देशातील नागरीकांना स्वच्छ , शुद्ध पाणी नळाद्वारे मिळाले पाहिजे म्हणून केंद्र सरकारने ग्रामीण जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची मोहीम हाती घेतली . ही योजना राबवत असताना योजनेवर होणाऱ्या खर्चाचा ५० टक्के वाटा केंद्र सरकार तर ५० टक्के वाटा हा राज्य सरकारने उचलवायचा आहे . बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ तालुक्यामध्ये ग्रामीण जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत . परंतू केंद्र सरकारची ही महत्वपूर्ण योजना गुत्तेदारांच्या आणि पुढाऱ्यांच्या भल्यासाठी आहे की काय ? अशी शंका व्यक्त केली तर गैर वाटणार नाही . ज्या गावामधील ग्रामपंचायत ज्या पक्षाच्या ताब्यात असले त्या पक्षाच्या मर्जीतील गुत्तेदाराला कामाचे वाटप करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे . जून महिना अर्धा संपलेला असताना जलजीवन मिशनची कामे उरकून घेण्याचा सपाटा गुत्तेदारांनी लावला आहे . पाऊस पडल्यानंतर कामे होणार नाहीत यामुळेच थातूरमातूर कामे करून गुत्तेदारचं स्वतःच जीवन उंचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी ओरड होवू लागली आहे . असे असले तरी ज्या यंत्रणेने जलजीवन मिशनच्या कामावर लक्ष ठेवायला पाहीजे , कामे दर्जेदार करून घ्यायला पाहीजेत त्यांचे मात्र या कामांकडे लक्ष असल्याचे दिसत नाही .
