अल् अतफ़ाल अरबी पुस्तक विद्यार्थ्यांना ज्ञान व सर्वांगीण विकासासाठी बहुउपयोगी - प्राचार्य इरफान सिद्धिक़ी

Beed

अल् अतफ़ाल अरबी पुस्तक विद्यार्थ्यांना ज्ञान व सर्वांगीण विकासासाठी बहुउपयोगी - प्राचार्य इरफान सिद्धिक़ी

बीड/प्रतिनिधी

येथील मिल्लिया गर्ल्स हायस्कूल मध्ये मौलाना सिद्दिक़ कासमी, पुणे यांनी अल अतफ़ाल अरबी या पुस्तकाचे विमोचन प्राचार्य इरफान सिद्दिक़ी यांच्या हस्ते केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शायर हसीन अख़्तर यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षीकांची उपस्थिती होती.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या एकाच पुस्तकामध्ये क़ुरआन अरबी, उर्दू, मराठी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याचे दोन भाग तयार करण्यात आलेले असून पहिला भाग हा इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी तर दुसरा भाग हा इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेला आहे. या पुस्तकाची निर्मिती अख़ाफ़ एज्युकेशन फाउंडेशन पुणे कडून करण्यात आलेली असून प्रकाशन अल् कलम पब्लिकेशन पुणे यांनी केले आहे.

या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी उपस्थित शिक्षक व शिक्षीकांना संबोधित करताना प्राचार्य इरफान सिद्दीक़ी म्हणाले की, जगासाठी, मानवासाठी मार्गदर्शक असणारे क़ुरआन या पुस्तकाच्या माध्यमातून प्रथमच एकाच पुस्तकात चार-चार वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध करून देण्यात आल्याने याचे वाचन करताना विद्यार्थ्यांना ज्या भाषेची आवड आहे किंवा ज्या भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे त्या भाषेमध्ये ते याचे वाचन करू शकतात. शिवाय प्रत्येक भाषेत गोडी असणारे विद्यार्थी तसेच इतरजन ही या चारही भाषेत या पुस्तकाचे वाचन करू शकतात. यामुळे हे पुस्तक ज्ञान वाढविण्यासह जीवन जगताना माणूस म्हणून आपली वर्तणूक कशी असावी हे समजण्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे म्हणून विद्यार्थ्यांसह मोठ्यांनीही या पुस्तकाचे वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी असे मत व्यक्त केले. तसेच ही पुस्तक तयार करणाऱ्यांसह याचे प्रकाशन करणाऱ्यांचे ही इरफान सिद्धिक़ी यांनी आभार मानले.

Sharing

Visitor Counter