एका रोमँटिक प्रेमकहाणीचा प्रभाव

एका रोमँटिक प्रेमकहाणीचा प्रभाव
नाट्य स्पर्धा : दोन स्पेशल नाटकातून रसिक झाले मंत्रमुग्ध
बीड/प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरु आहे.या स्पर्धेत बुधवार (दि.३०) रोजी दोन स्पेशल नाटक सादर करण्यात आले. या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय या संस्थेने सदरील नाटक सादर केले. प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन लिखित व दिग्दर्शक डॉ. संपदा कुलकर्णी यांनी दोन स्पेशल या नाटकातून एका दैनिकाच्या कार्यालयात घडलेली रोमँटिक प्रेमकहाणी आणि भोवतालच्या घटना अगदी उत्तमरीत्या मांडून रसिकांची मने जिंकली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाणे बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत बुधवार (दि.३०) नोव्हेंबर रोजी सादर झालेले दोन स्पेशल या नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘दोन स्पेशल’ हे नाटक एका विचित्र परिस्थितीत दुरावलेल्या दोन प्रेमी जीवांची हळवी गोष्ट सांगतं. ते एका वृत्तपत्राच्या कचेरीत घडतं आणि त्यातलं नाट्य एका पत्रकाराच्या संदर्भात उभं राहातं म्हणून ते पत्रकारितेतल्या मूल्य तडजोडीच्या संघर्षाबद्दल बोलणारं नाटक आहे, असं मानणं चूक आहे. तसा भ्रम ते जरूर उत्पन्न करतं पण नाटकाचा खरा जीव हा रोमँटिक प्रेमकहाणीचा आहे.त्यातली अधुरेपणाची हुरहूर, परिस्थितीच्या बेचक्यात सापडलेल्या माणसांची अगतिकता आणि एकमेकांपासून दुरावण्यातली कासाविशी हे नाटक उत्तमपणे पकडतं.क्षितीज पटवर्धनने कथेचं नाटकात रूपांतर करताना त्यातले भावनात्मक ताण उत्तम हेरले आहेत.या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. अशी माहिती बीड केंद्राचे समन्वयक मुकूंद धुताडमल यांनी दिली.
