बार्शी नाक्यावर बसची काच फोडली,वाहतूक ठप्प, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

बसमध्ये महिला छेडछाडीमुळे गोंधळ; महिलांना बस मध्ये मारहाण
बार्शी नाक्यावर बसची काच फोडली,वाहतूक ठप्प, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
बीड प्रतिनिधी
शहरातील बार्शी नाका चौकात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या बसमध्ये महिला प्रवाशाच्या छेडछाडीच्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. बस (क्रमांक MH 09 FL 0968) बार्शी नाका चौकात आल्यानंतर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकाला घटनास्थळी बोलावून घेतले. संबंधित व्यक्तीस बसबाहेर काढण्याचा प्रयत्न होत असताना बसमधील गर्दी आणि तणाव पाहून बस चालक व कंडक्टरने बसचे दरवाजे बंद करून घेतले.
यामुळे संतप्त जमावाने बससमोर येत ती अडवली आणि बसच्या समोरील काच फोडली. काही वेळातच बार्शी नाका चौकात मोठी गर्दी झाली आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. या गोंधळामुळे बार्शी नाका चौकात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
पीडित महिलेने सांगितले की, "मी बस थांबवण्यासाठी विनवणी करत होते, पण बस थांबत नव्हती. त्यामुळे मी आरडा-ओरड केली, त्यानंतर लोक जमले आणि त्यांनी बस थांबवली." या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस अधिक तपास करत असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चौकट...
एस.टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चालकांनी शिवाजी चौकात बसेस आणून उभ्या केल्या आहेत. वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या सर्व बसचालकांनी "बस बंद" असा नारा दिला असून, त्यांनी प्रवास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.








