11 जुलैला रिपाइंचा राज्यात एल्गार!राजगृहावरील तोडफोड अन् दलित,बौद्धांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन-पप्पू कागदे

11 जुलैला रिपाइंचा राज्यात एल्गार!राजगृहावरील तोडफोड अन् दलित,बौद्धांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन-पप्पू कागदे
बीड,दि.8/प्रतिनिधी:
राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे; घरे जाळल्याचे; दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या दि.11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय; तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेलया पत्रकात म्हटले आहे की, निषेध आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे असे पप्पू कागदे यांनी सांगितले आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ’राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमर्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली.राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.हे ठिकाण म्हणजे आमच्या साठी ऊर्जाचे ठिकाण आहे. घरामधील ही वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा देखील रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पप्पू कागदे यांनी दिली.
राज्यात दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रश्नावर निषेध आंदोलन करण्यासाठी दि. 11 जुलै ही तारीख निवडण्यात आली कारण दि.11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 11 जण शाहिद झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन करते. त्यामुळे दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करणार आहेत अशी माहिती पप्पू कागदे यांनी दिली आहे.








