सात वर्षांनी भरून आलं आयुष्याचं रिकामपण..आईवडिलांच्या अश्रूंना मिळाला त्यांचा हरवलेला राजू..!

*"द" मिरर..!*
सात वर्षांनी भरून आलं आयुष्याचं रिकामपण..आईवडिलांच्या अश्रूंना मिळाला त्यांचा हरवलेला राजू..!
जगातल्या प्रत्येक आईसाठी तिचं मूल म्हणजे तिचं संपूर्ण विश्व असतं आणि त्या विश्वात जर कधी काळोख पसरला, तर काळजाचा ठावच हरवतो. अशीच एक कहाणी आहे राजूची… आणि त्याच्या आईवडिलांच्या अश्रूंत दडलेल्या सात वर्षांच्या आर्त वेदनेची.
२०१७ साली, नियतीने एक पान फाडलं आणि त्या पानावर एका गरिब ऊसतोड कामगाराच्या मुलाचं नाव "राजू काकासाहेब माळी" हरवलं. वय होतं केवळ १६ वर्ष… शिक्षणासाठी आईवडिलांपासून दूर गेलेला हा निष्पाप मुलगा एका शिक्षकाच्या घरी राहत होता. पण एक दिवस अचानक, कोणालाही काही न सांगता, कोणतीही खूण न ठेवता तो नाहीसा झाला.
आईवडील तेव्हा कर्नाटकात ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. अशिक्षित होते, कोणाकडे धाव घ्यावी, तक्रार कुठे करावी, हेही माहीत नव्हतं. त्यांनी फक्त वाट पाहिली दिवस, महिने आणि अखेर वर्ष उलटली पण राजू परत आला नाही. सात वर्षे काळजात सतत चाललेली असहाय्य आर्त हाक, अश्रूंनी ओथंबलेले डोळे, आणि काळजाला पोखरणाऱ्या रात्री,पण आशा संपलेली नव्हती.
२०२३ मध्ये, या आईने शेवटी धीर करून पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि यानंतर या प्रकरणाची जबाबदारी "Anti Human Trafficking Unit" कडे वर्ग झाली. केस हाती घेतली पीएसआय पल्लवी जाधव यांनी. या क्षणापासून, एक आईच्या काळजावरचं ओझं त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं.
तपास सुरू झाला,शिक्षकांची चौकशी झाली, तांत्रिक तपशील, मोबाइल ट्रॅकिंग, सर्वकाही झपाट्याने चाललं. आणि पुण्यात एक आशेचा किरण दिसला राजूचं लोकेशन मिळालं! LCB च्या मदतीने राजूचा ठाव लागला त्याला विश्वासात घेऊन, सावधपणे, प्रेमाने त्याच्यापर्यंत पोचलं गेलं आणि अखेर तो क्षण आला राजू परत आला आपल्या आईवडिलांकडे,आपल्या मायेच्या कुशीत!
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या समोर, जेव्हा राजू आईच्या मिठीत विसावला तेव्हा संपूर्ण खोलीत एक भावना उसळली एक आवाज नसलेला हुंदका सर्वांच्या काळजाला भिडला. सात वर्षांची वेदना एका मिठीत विरून गेली,काळजाच्या जखमा जणू पुसल्या गेल्या.ही कहाणी केवळ एका तपासाची नाही,ही कहाणी आहे एका आईवडिलांच्या अमर प्रेमाची, एका पोलीस अधिकाऱ्यांच्या समर्पित कार्याची आणि एका हरवलेल्या मुलाच्या परतीच्या आश्वासक प्रवासाची!
या कार्यवाहीमागे अथक मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे लिहिल्याशिवाय ही कहाणी पूर्ण होणार नाही पोलीस अधीक्षक नवनीत कांवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,पोनि शिवाजी बंटेवाड,पीएसआय पल्लवी जाधव,पीएसआय श्रीराम खटावकर,आणि AHTU व LCB ची सर्व टीम हे केवळ अधिकारी नाहीत, आईच्या अश्रूंना समजून घेणारे देवदूत आहेत.हरवलेल्या पावलांना दिशा दाखवणारे खरे रक्षक आहेत. या समाजात अजून माणुसकी शिल्लक आहे, याचा जिवंत पुरावा आहेत!
काझी समीरोद्दिन
मो. 9049904996








