शेअर मार्केटमध्ये २२ लाखांची फसवणूक  तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

Beed

शेअर मार्केटमध्ये २२ लाखांची फसवणूक 

तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

बीड प्रतिनिधी 

शहरातील शहंशा नगर येथील एका तरुणाने शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून तब्बल २० ते २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाने काही व्यक्तींवर गंभीर आरोप करत सांगितले आहे की, त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच्याकडून लाखो रुपये घेतले. मात्र, नफा तर दूरच, पैसे परत मागितले असता त्यांनी "पैसे परत देणार नाही, तुला काय करायचं ते कर" असे उद्धट उत्तर दिल्याचे त्याने नमूद केले आहे.

या फसवणुकीमुळे मानसिक तणावात गेलेल्या तरुणाने अखेर विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी वेळेवर लक्ष दिल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, तरुणाने व्हिडिओत ज्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे, त्यांच्याविरोधात तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. 

 

Sharing

Visitor Counter