अखेर ती शिवरीची झाडे तोडण्यास सुरुवात

अखेर ती शिवरीची झाडे तोडण्यास सुरुवात
विकास कामे होणे आवश्यक पण हाल्या हो प्रमाणे नको - एस.एम.युसूफ़
बीड/प्रतिनिधी
बीड नगर परिषद च्या नवनियुक्त मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी केलेली पाहणी व दिलेल्या निर्देशानंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे च्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात येणाऱ्या नाल्या च्या भिंतींना कालांतराने नुकसानकारक ठरणाऱ्या तीन शिवरीच्या झाडांना तोडण्यास एकदाची सुरुवात झाली. हे पाहता शहरात विकास कामे करणे आवश्यक आहेच मात्र ती हाल्या हो प्रमाणे करता कामा नये असे उद्विग्न मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहराची अवस्था एखाद्या भकास रखरखत्या डोंगराळ भागासारखी झालेली आहे. गलिच्छतेने बरबटलेले कचरा स्थान (यांना कुंड्या म्हणता येणार नाही कारण अनेक कचरास्थानावर कुंड्याच नाहीत), वेळोवेळी काढण्यात न येणाऱ्या तुंबलेल्या नाल्या, खड्डे पडलेले उधळलेले रस्ते, कच्चे रस्ते, तर अनेक ठिकाणी निव्वळ मुरमाड रस्ते, त्यातून उडणारा धुरडा यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना व नाकाद्वारे फुफ्फुसांना होणारा त्रास, पाली आणि माजलगाव चे धरण तुडुंब भरलेले असूनही काही भागात ८ दिवसाआड तर काही भागात १५ ते २० दिवसाआड नळांना सोडण्यात येणारे पाणी, अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य, घराघरात धूर फवारणी व नाल्यात औषध फवारणी होत नसल्याने डासांचा सुळसुळाट, डास प्रतिबंधित साधने (लिक्विड, कॉइल इ.) वापरल्याशिवाय रात्रीची झोप न येणे असे एक ना अनेक नागरिकांच्या मूलभूत हक्काचे प्रश्न वर्षानुवर्षांपासून जसेच्या तसे पडून आहेत. लोकप्रतिनिधी एकदा निर्वाचित झाले की, जनतेशी फारकत घेतल्यासारखे वागतात. कर्तव्यदक्ष अधिकारी जनहिताची कामे करण्याकरिता सरसावले तर त्यांना दाबतात. अशा एक ना अनेक भानगडी व समस्या बीड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यामुळे शासनाकडून वेळोवेळी येणारा कोट्यावधींच्या निधीने जनहिताची कामे दर्जेदार चांगली व गुणवत्तात्मक करणे अपेक्षित असताना ती तशी होत नाहीत. असाच प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून आसेफ़नगर येथील मुख्य रस्ता, नाली व नाल्याच्या कामाबाबत सुरू होता. म्हणून या सर्व बाबी नवनियुक्त मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्याकडे मांडण्यात आल्यानंतर त्यांनी जातीने या ठिकाणी येऊन पाहणी करत गुत्तेदारांना निर्देश देऊन योग्य ते काम करण्यास सांगितले. यामुळे येथील बांधकाम सुरू असलेल्या नाल्यालगतची शिवरीची तीन झाडे तोडण्यास एकदाची सुरुवात झाली आहे. हे पाहता बीड शहरात विकास कामे करणे अत्यंत आवश्यक आहे पण ती हाल्या हो प्रमाणे व्हायला नको असे उद्विग्न मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून मांडले आहे.








