प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढला, प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संताप

Beed

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढला, प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संताप

नाशिक आणि इतर ठिकाणचे प्रकल्पग्रस्त झाले सहभागी, अनेकांनी दिला पाठिंबा

परळी वैजनाथ/वार्ताहर

         आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण सुरू करून प्रकल्पग्रस्तांचे आज सातव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. अनेकांची प्रकृती खालावली असली जमिनी संपादन करणाऱ्या महानिर्मिती कंपनी आणि प्रशासनाला जाग न आल्याने नातेवाईक आणि नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आज विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरीकांनी उपोषणाला भेटी देऊन पाठिंबा व्यक्त केल्याचे महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी दिला आहे. दरम्यान आज नाशिक येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत.

        शनिवारपासून प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय्य मागण्यांसाठी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, 45 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आदी प्रमुख मागण्या आहेत. उपोषण सुरू होऊन सात दिवस झाले तरी अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या तब्येती खालावल्या आहेत. दोघांना दवाखान्यात नेले असता त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे ते पुन्हा उपोषणात सहभागी झाले आहेत.

 

नाशिकचे प्रकल्पग्रस्त उपोणाला

        प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आमरण उपोषण असुन यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे कुटुंबीयांचा पाठिंबा आहे. आज नाशिक येथील प्रकल्पग्रस्त परळीत दाखल होऊन उपोषणाला बसले आहेत. महानिर्मिती कंपनी आणि प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करणार असून झालेल्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहिल असा इशारा महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी दिला आहे.

Sharing

Visitor Counter