एस.पी.साहेब तुमच्या पोलिसांचे ‘हे कर्तव्य’ कोणासाठी?

एस.पी.साहेब तुमच्या पोलिसांचे ‘हे कर्तव्य’ कोणासाठी?
अपघातास कारणीभूत असलेला ट्रक मालकाचा फोन येताच सोडून दिला
बीड/प्रतिनिधी
चार दिवसापूर्वी बार्शीनाका चौकात 14 टायरच्या ट्रकने मजूराला धडक देवून गंभीर जखमी केल्यानंतर घटनास्थळावर उभा असलेला ट्रक मालकाचा फोन येताच पोलिसांनी सोडून दिला. एकीकडे पोलिस जनतेसाठी कर्तव्यावर असतो असे म्हणतात परंतू या प्रकरणात ‘त्या’ पोलिसांनी बजावलेले कर्तव्य नेमके कोणासाठी होते याचे उत्तर पोलिस अधिक्षकांनीच चौकशीच्या माध्यमातून दिले पाहीजे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, 24 डिसेंबर रोजी परराज्यातल्या एका मजूराला 14 टायर असलेल्या ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रेमराव मधुसुदनराव हा गंभीर जखमी झाला आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला परंतू अपघातानंतर घटनास्थळावर अपघातास कारणीभूत असलेला ट्रक उभा होता. चालक देखील घटनास्थळीच होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी जखमीला रूग्णालयात दाखल केले परंतू मालकाचा फोन येताच ट्रकला मात्र सोडून दिले गेले. जनतेच्या रक्षणासाठी पोलिस कर्तव्यावर असतात असे म्हणतात परंतू या अपघाताच्या प्रकरणात त्या दोन पोलिसांनी निभावलेले कर्तव्य हे पोलिस खात्यासाठी होते की त्या मालकासाठी? याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिस अधिक्षकांनी एका गरीब मजूराच्या मृत्युनंतर त्याच्या कुटूंबियांना न्याय देण्यासाठी त्या दोन पोलिसांची चौकशी करून दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील एक पोलिस कर्मचारी हा गेवराई येथील पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावून बदलीवर बीडला आलेला आहे. अपघातास कारणीभूत असलेला ट्रक देखील गेवराईचाच असल्याचे समोर येत असल्यामुळे या दोघांचे लागेबांदे जुनेच असावेच असा अंदाज यामुळे बांधावाच लागेल. विशेष म्हणजे सदरच्या ट्रकचा मालक हा वेगवेगळ्या धंद्यात सक्रीय असल्याचे पुढे येते. गोरगरीबांच्या तोंडात जाणारा स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळाच्या काळ्या बाजार प्रकरणी देखील त्याचे नाते असल्याचे समजते. कदाचित सोडून दिलेल्या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील लाखो रूपयांचा माल असावा त्यामुळेच पोलिसांनी ट्रक सोडला अशी चर्चा सुरू आहे.
"त्या" दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल चेक करा
अपघाता सकारणीभूत असलेल्या ट्रक सोडून दिला तेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर ट्रक सोडण्याची कारवाई पूर्ण झाली फोन करणारा व्यक्ती कोण आणि त्याचा पोलिसांशी संबंध काय याची खात्री करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी त्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे त्यावेळचे कॉल डिटेल्स चेक करावेत जेणेकरून यात कोणी हस्तक्षेप केला? का केला? हे समोर येईल.








