... त्या मजूराचा मृतदेह दोन दिवस जिल्हारूग्णालयातच

... त्या मजूराचा मृतदेह दोन दिवस जिल्हारूग्णालयातच
बार्शीनाक्यावरील अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन पळून गेले की सोडले?
बीड। प्रतिनिधी
बाहेरच्या राज्यातून बीड शहरात पोट भरण्यासाठी आलेल्या एका मजूराला 14 टायरच्या गाडीने उडविल्यानंतर त्याच्यावर गंभीर जखमी अवस्थेत बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते परंतू उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यु झाला. 24 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर 25 डिसेंबर रोजी सदर जखमीचा मृत्यु झाला परंतू अपघातास कारणीभूत असलेली 14 टायरची ट्रक मात्र घटनास्थळावरून निघून गेली होती. त्यामुळे हा ट्रक पळून गेला की पोलिसांनी सोडून दिला अशी चर्चा होत आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, प्रेमराव असे हातावर नाव असलेल्या 24 वर्षीय मजूर असलेल्या युवकाला 14 टायरच्या ट्रकने धडक दिल्याची घटना बार्शीनाका परिसरात 24 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाल्यानंतर पेठबीड पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी अपघातस्थळी उपस्थितीत होते. त्यांनी जखमीला बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना 25 डिसेंबर रोजी सदर जखमीचा मृत्यु झाला. त्यावेळी त्याची ओळख पटली नव्हती. परंतू नंतर तो छत्तीसगड राज्यातील असल्याचे व बीडमधील खंडेश्वरी भागात असलेल्या आयटीआय कॉलेज परिसरात राहत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. तब्बल दोन दिवस प्रेमरावचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात होता. 27 डिसेंबर रोजी त्याचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतू अपघातानंतर घटनास्थळी असलेला 14 टायरचा ट्रक मात्र घटनास्थळावरून निघून गेला होता. मग हा ट्रक चालकाने पळून नेला की पोलिसांनी सोडून दिला अशी चर्चा सुरू झाली आहे. जर सोडून दिला असेल तर त्याच्या मागचे कारण काय? ट्रकमध्ये कोणता माल होता? हे सर्व प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. दरम्यान अपघातग्रस्ताचा मृत्यु जिल्हा रूग्णालयात झाल्यानंतर देखील जिल्हा रूग्णालय पोलिस चौकीला या संदर्भातील एमएलसी नोंद नसल्याचे समजते. त्यामुळे रूग्णालय पोलिस चौकीला नोंद का झाली नाही हा देखील प्रश्नच आहे. सुरूवातीला अनोळखी असलेल्या या व्यक्तीचे जवळचा नातेवाईक कोणीच समोर येत नसल्यामुळे एमएलसीपासून ते ट्रक निघून जाण्यापर्यंत नेमके काय झाले हे संबंधित पोलिसांनाच माहित.
घटनास्थळी असलेल्या पोलिसांना फोन आला कोणाचा?
बार्शीनाका परिसरात अपघाताची घटना घडल्यानंतर दोन पोलिस कर्मचारी घटनास्थळी होते. जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी एक कर्मचारी जाणे अपेक्षीत होते तर दुसर्या कर्मचार्याने अपघातास कारणीभूत असलेला ट्रक थांबवून घेणे गरजेचे होते. तसे न होता दोन्ही पोलिस कर्मचारी जखमीला रूग्णालयात दाखल करण्यासाठी कसे गेले, दरम्यानच्या काळात एका पोलिस कर्मचार्याला कोणाचा फोन आला या बरोबरच ट्रक मालक ज्या गावचा त्याच गावात दोन पोलिस कर्मचार्यांपैकी एकाने कर्तव्य बजावलेले असल्यामुळे दोघांचे तर फोनवर संभाषण झाले नाही ना? आणि त्यामुळे गाडी घटनास्थळावरून निघून गेली नाही ना? अशी चर्चा होवू लागली आहे.
गुन्ह्याची नोंद झाली कुठे?
अपघातात मयत झालेल्या प्रेमरावच्या नातेवाईकांनी 27 डिसेंबर रोजी मृतदेह ताब्यात घेतला व ते जिल्हारूग्णालयातून निघूनही गेले परंतू या अपघाताची नोंद दवाखाना चौकीला नसल्याचे तेथील कर्मचार्यांनी सांगितले. बार्शीनाका परिसर पेठबीड हद्दीत येत असल्यामुळे पेठबीड पोलिसांशी संपर्क साधला असता असा कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे पेठबीड पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गुन्ह्याची नोंद नेमकी झाली कुठे का झालीच नाही असा प्रश्न उपस्थितीत होतो.








