व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी संजय मालाणी

व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी संजय मालाणी
बीड/प्रतिनिधी
दि.25 ः येथील दैनिक प्रजापत्रचे सहसंपादक संजय मालाणी यांची ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या देशपातळवरील पत्रकार संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. रविवारी (दि.25) बुलढाणा येथे ‘व्हाईस ऑफ मीडिया’ची एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यामध्ये संजय मालाणी यांच्यावर संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी राज्य कार्यवाहक तथा बीडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांची उपस्थिती होती.
मागच्या 22 वर्षांपासून जेष्ठ पत्रकार संजय मालाणी हे बीडमध्ये पत्रकारिता करत आहेत. गेल्या दोन दशकात त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील वंचित, उपेक्षितांना न्याय देण्याबरोबरच अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना व्हाईस ऑफ मीडिया या देशपातळवरील पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर येण्यासाठी संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांनी आमंत्रित केले होते. रविवारी बुलढाणामध्ये संघटनेची एक दिवसीय कार्यशाळा होती. या कार्यक्रमात संजय मालाणी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर श्री.मालाणी यांनी संदीप काळे यांची काम करण्याची सकारात्मक भूमिका आपल्याला आवडली असल्याचे सांगत, संघटनेचा शेवटचा कार्यकर्ता म्हणून आपण पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. तसेच संघटनेने जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे, त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. यावेळी कवी साहित्यिक यशवंत मनोहर, आ. संजय गायकवाड, डॉ. नरेश बोडखे, राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, राज्य कार्यवाहक तथा बीडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर धांडे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्याचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. दरम्यान, निवडीबद्दल संजय मालाणी यांचे अभिनंदन केले जात आहे.








