पॉझिटीव्ह पत्रकारितेत मोठी ताकद - संदीप काळे

पॉझिटीव्ह पत्रकारितेत मोठी ताकद - संदीप काळे
प्रतिनिधी/बीड
दि.24 : व्हाईस ऑफ मीडिया ही राष्ट्रीय पत्रकार संघटना असून देशातील 20 मोठ्या संपादकांनी एकत्रित येत तिची स्थापना केलेली आहे. पत्रकारांसाठी घर, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांचे अपघात, भविष्य पुंजीबाबत तरतूद, पत्रकारानी शिकायचे नवे तंत्रज्ञान, सेवा निवृत्तीनंतर आयुष्याचे व्यवस्थापन, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य सेवा पत्रकार जोपासत असलेल्या छंदासाठी खास शिष्यवृत्ती, अन्य देश आणि राज्य यासाठी पत्रकारांचे खास अभ्यास टूर आदींवर ही संघटना काम करणार आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे पॉझिटीव्ह पत्रकारिता हे या संघटनेचं मुख्य काम असून तीच पत्रकारितेची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले आहे.
बीड येथे दैनिक कार्यारंभमध्ये आयोजित बीड जिल्ह्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरसकर, राजेंद्र होळकर, अभिमन्यू घरत, संजय मालाणी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना संदीप काळे म्हणाले, पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने आहेत. दिवसेंदिवस पत्रकारिता करणे अवघड होऊन बसले आहे. सध्या निगेटीव्ह बातम्यांचा भडीमार सुरू आहे. त्यामुळे पत्रकारितेचं वातावरण गढूळ बनले आहे. व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारितेला नवीन दिशा देण्याचं काम करणार असून पॉझिटिव्ह पत्रकारिता करणार्या पत्रकारास ‘तीन लाख रुपयांचा व्हाईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह पत्रकारिता पुरस्कार’ दिला जाणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन ते सकारात्मकतेने पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील क वर्ग दैनिकांचे प्रश्न गंभीर असून लवकरच मुख्यमंत्री आणि माहिती महासंचालक यांच्या एकत्रित बैठकीत समन्यायी जाहीरात वाटपाचा प्रश्न निकाली लावू अशी ग्वाही देखील संदीप काळे यांनी दिली.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जालींदर धांडे, अनिल जाधव, उदय नागरगोजे, शिरीष शिंदे, प्रभात बुडूख, सुनील यादव, केशव कदम, अमोल मुळे, शुभम खाडे, मुकेश झणझणे, ज्ञानेश्वर वायबसे, अजित रांजवण, अशोक शिंदे, गणेश जाधव आदींची उपस्थिती होती. तर माजलगावमधील तालुकाध्यक्ष वैजेनाथ घायतिडक, तालुका कार्याध्यक्ष राजेभाऊ पास्टे, बैठकीस यांची उपस्थिती होती.








