परिसर स्वच्छते बरोबरच मनाची मलीनता घालवणे गरजेचे -सुधाकर विद्यागर

परिसर स्वच्छते बरोबरच मनाची मलीनता घालवणे गरजेचे -सुधाकर विद्यागर,
संत गाडगेबाबा व माता भिमाई स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
बीड/प्रतिनिधी
थोर समाज सुधारक संत गाडगे बाबांनी परिसर स्वच्छते बरोबरच व्यसनाधीनता,अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी परंपरामुळे मन कसे मलिन होते हे ह्या दुर्गुणा पासून दूर राहणे कसे मानवाच्या हिताचे आहे हे आपल्या कीर्तनातून समजावून सांगितले. त्यांच्या उपदेशाचे जीवनात आचरण करणे हेच त्यांना खरे विनम्र अभिवादन ठरेल असे संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या स्मृतिदिनी अभिवादन करून सुधाकर विद्यागर यांनी प्रतिपादन केले.
सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे कार्यालय धानोरा रोड बीड येथे थोर संत गाडगेबाबा व महामाता भिमाई स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपासिका आशाताई विद्यागर, रेश्मा विद्यागर यांनी संत गाडगेबाबा व महामाता भिमाई यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन डी.एम राऊत यांनी केले. डी.जी वानखेडे यांनी संत गाडगेबाबांनी समाजाच्या उद्धाराकरता केलेल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाच्या कार्याबद्दल उजाळा दिला व संतांचे, महापुरुषांचे जीवन कार्य वाचताना त्यानुसार आपल्या जीवनात आचरण कसे करता येईल हाच बोध घेऊन त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करून तसा निश्चय करणे गरजेचे आहे. समाज धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय,अत्याचार आणि तो दूर करण्यासाठी संत गाडगेबाबा व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब जीवनभर झगडत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये करारीपणा,स्वाभिमानाचे जगणे हा गुण महामाता भिमाईच्या जीवनाच्या अभ्यासातून कळून येतो असे भिमाईच्या जीवना वर बोलताना स्पष्ट केले.अभिवादन कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष जी.एम भोले.जिल्हा अध्यक्ष कॅप्टन राजाभाऊ आठवले,एड. के.आर.गाडे,पी.डी.पंडित, तालुकाध्यक्ष काशिनाथ वाघमारे व प्रा.डॉ.संजय सावते, प्रा.डॉ.जिंजुर्डे आत्माराम ,अरविंद डोळस व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.








