बीड जिल्ह्यात मंडणगड पॅटर्न यशस्वी,1346 विद्यार्थ्यांना विशेष मोहिमेअंतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप

बीड जिल्ह्यात मंडणगड पॅटर्न यशस्वी,1346 विद्यार्थ्यांना विशेष मोहिमेअंतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप
बीड/वार्ताहर
जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्ह्यात 'मंडणगड पॅटर्न' राबविण्यास सुरुवात करण्यात आली. पॅटर्नची फलश्रुती झाली असून, मोहिमेच्या कालावधीत 1346 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अधिकारी, कर्मचारी व समतादुत यांनी जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली, या विशेष मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिपुर्ण प्रस्ताव दाखल करणे सोयीचे झाले. परिणामी, जिल्हा जात पडताळणी समितीने तातडीने प्रस्ताव निकाली काढून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केले.
विज्ञान शाखेत प्रवेशित 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्याची इत्यंभूत माहिती नसते प्रमाणपत्र न मिळाल्यास विविध अभ्यासक्रमास त्यांना प्रवेश मिळू शकत नाही, शैक्षणिक कामाकरिता जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सदर प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. महासंचालक धम्मज्योती गजभिये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी राज्यात "मंडणगड पॅटर्न' राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात गत महिन्यापासून विशेष मोहीम राबवून करण्यात आली.
जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष मा.श्री.दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्रीमती. संगीता मकरंद सदस्य सचिव श्री. प्रदीप भोगले यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले. यासाठी जात पडताळणी समितीचे सर्व कर्मचारी,बार्टी समतादूत आदींनी परिश्रम घेतले.
विशेष मोहिमेत 1346 प्रमाणपत्र वाटप
जिल्ह्यात मंडणगड पॅटर्ननुसार जात वैधता प्रमापणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. 01 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात 1346 विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.








