बेजार झालेल्या इच्छूकांना निवडणुक आयोगाचा दिलासा

बेजार झालेल्या इच्छूकांना निवडणुक आयोगाचा दिलासा
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरता येणार
बीड/प्रतिनिधी
वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा मुहूर्त सापडल्यानंतर अर्ज भरतानाच सर्व्हर दगा देत असल्यामुळे अनेक इच्छूक त्रस्त झाले होते परंतू सर्व्हरच्या दुखण्यावर निवडणुक आयोगानेच उपचार करत ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वी पुढे ढकललेल्या असल्यामुळे इच्छूकांना बरेच दिवस संधीची वाट पाहत बसावे लागले होते असे असताना विद्यमान सरकारने आघाडी सरकारचा निर्णय बदलत सरपंच देखील जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली. असे असताना इच्छूकांना अर्ज भरताना मात्र सर्व्हरच्या दुखण्याने त्रस्त केले होते. अर्ज भरण्याची मुदत संपत येत असताना दगा देणार्या सर्व्हरचा त्रास संभाव्य उमेदवारांना होत असल्यामुळे माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्या संदर्भात मागणी केली होती. जिल्हाधिकार्यांनी निवडणुक प्रक्रियेतील सर्व्हरमुळे येत असलेली अडचण लक्षात घेवून निवडणुक आयोगाशी संपर्क साधला. गुरूवारी सकाळी निवडणुक आयोगाने जिल्हाधिकार्यांमार्फत ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिल्यामुळे गेल्या काही दिवसापासून अर्ज भरण्यासाठी धडपडत असलेल्या इच्छूक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
अडीज तासांनी वेळ वाढली
ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी निवडणुक आयोगाने देत असताना अडीज तासाने वेळ देखील वाढून दिली आहे. पुर्वी 2 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार होते परंतू आता ऑफलाईन पद्धतीने भरलेले अर्ज 2 डिसेंबरच्या सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत स्विकारले जाणार आहेत.








