संविधान हाच आपल्या जगण्याचा मार्ग-पप्पू कागदे

संविधान हाच आपल्या जगण्याचा मार्ग-पप्पू कागदे
बीड / प्रतिनिधी
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. लोकशाहीची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडते तेव्हा लोकशाहीला आधार देणारा, प्राणवायू देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे. असल्याचे मनोगत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.
बीड शहरातील रिपाइं मध्यवर्ती कार्यालय येथे शनिवार (दि.२६) रोजी संविधान दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पप्पू कागदे बोलत होते. यावेळी माजी.मंत्री प्रा.सुरेश नवले, अॅड.बाळासाहेब राख, महादेव धांडे,राजू जोगदंड, राजेश बांगर,नारायणराव धांडे,भैय्या मस्के आदी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करतांना पप्पू कागदे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये विविध छोटी छोटी राज्ये होती. या राज्यांची मोट बांधणे आणि त्यांच्यात आपण सगळे एक आहोत किंवा हम सब एक’ है ही संकल्पना रुजवून नव्या आकांक्षा निर्माण करणे ही बाब भारतीय संविधांनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. संविधानाला हुकुमशाही मान्य नाही.संविधान हे एकमेकांच्या अस्तित्वाला महत्त्व देणारे आहे. राष्ट्रहिताला प्राधान्यक्रम देणारे आहे. सर्वाचे सर्वसमावेशक विकासाचे सूत्र त्यातून स्वीकारण्यात आले आहे. विशिष्ट समाजाचा विकास आणि उर्वरित त्यापासून वंचित असे होऊ शकत नाही. सर्वांचा सर्वसमावेशक विकास अभिप्रेत आहे. म्हणूनच भारतीय हिताचा संविधानात समावेश करताना कल्याणकारी व्यवस्था सांगण्यात आली आहे.आपण लोकशाही राष्ट्र असल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांची जोपासना करणे आपले काम आहे. म्हणूनच देशाचे सर्व नागरिक संविधानाप्रती जागरूक असले पाहिजेत. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे. तोच नेमका विचार आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. असल्याचे मत पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. यावेळी रिपाइं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.








