ट्रॅव्हल्स चालकांनी बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारल्यास दंडात्मक कारवाई

ट्रॅव्हल्स चालकांनी बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारल्यास दंडात्मक कारवाई
बीड/वार्ताहर
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी बस वाहतूकदार हे जादा बस भाडे आकारुन प्रवाशांची लुट करीत असल्यास त्या वाहन धारकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत. या अनुषंगाने येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीड जिल्हा प्रवासी बस ओनर्स असोसिएशनची बैठक घेण्यात आली. यावेळी दिवाळी सणनिमित्त एसटी महामंडळाच्या त्या त्या संवर्गाच्या बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारु नये, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी दिले.
या बैठकीस एम.आय.खान (सागर ट्रॅव्हल्स), शेख इसाक सौदागर (हिना ट्रॅव्हल्स), विलास डावेकर (महाराजा ट्रॅव्हल्स), शेख वसिम (ॲपल ट्रॅव्हल्स), शेख सोहेल (राजमाता ट्रॅव्हल्स), न्यु हिना ट्रॅव्हल्स आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करु नये. वाहनाचा विमा, फिटनेस, कर वैध असल्याशिवाय वाहन रस्त्यावर काढू नये. तसेच वाहनांत प्रथमोपचार व अग्निशामक यंत्रणा अद्ययावत ठेवण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.








