मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाची सांगता

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाची सांगता
बीड/वार्ताहर
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृत महोत्सवानिमित ध्वजारोहण, रॅली व पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर बीड शहरातील श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या तिरंगा रॅलीस श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास 2 हजार 500 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'इन्कलाब जिंदाबाद', 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा' व 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' या सारख्या राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे यांनी विचार व्यक्त करताना देशातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहावे. तसेच, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर स्वविकासातून राष्ट्राचे हित साधावे, असे आवाहन केले. तर शिक्षणाधकारी (प्राथमिक) श्रीकांत कुलकर्णी यांनी, मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची माहिती देताना या लढ्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशाप्रती जाज्वल्य भावना जागृत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक प्रचार अधिकारी पी. कुमार, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उपमुख्याध्यापक राजकुमार कदम, पर्यवेक्षक बी. डी. मातकर, प्राचार्य श्री. मुखेकर आदी उपस्थित होते. या रॅलीचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, अहमदनगर येथील कार्यालयाने, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, बीड यांच्या सहकार्याने केले होते.








