बीडमध्ये आजपासून तीन दिवसीय दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन

Beed

बीडमध्ये आजपासून तीन दिवसीय दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन

भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहायला मिळणार

 बीड/वार्ताहर 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बीड येथे दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत तीन दिवसीय दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहण्यासाठी या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

            अहिल्याबाई सांस्कृतिक सभागृह, भाजी मंडई रोड येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील (सन 1857 ते 1947) विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि थोर स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा माहिती कार्यालय,बीड व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

 

            या तीन दिवसीय प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त सकस आहाराचे प्रदर्शन, विविध स्पर्धा, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी शहरातील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली व नगर परिषदेच्या महिला बचत गटांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, बीडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने, शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थांना या प्रदर्शनास भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

            भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहण्यासाठी या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी फणी कुमार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter