डॉ. योगेश क्षीरसागर आहेत कोण ? जिल्हाधिकारी, प्रशासक की मुख्याधिकारी !       

Beed

डॉ. योगेश क्षीरसागर आहेत कोण ? जिल्हाधिकारी, प्रशासक की मुख्याधिकारी !                                                      

कडक पावले उचलली जातील - अॅड. शेख शफिक भाऊ

बीड/प्रतिनिधी  

नगरपरिषद ची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून डॉ. योगेश क्षीरसागर हे प्रसिद्धी माध्यमातून शहरातील विविध कामांंबाबत सातत्याने पत्रकपंची करू लागल्याने ते आहेत कोण ? जिल्हाधिकारी, प्रशासक की मुख्याधिकारी असा प्रश्न उपस्थित करून एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी जर ही पत्रकपंची अशीच चालू राहिली तर कडक पावले उचलली जातील असा इशारा प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, लवकरच बीड नगर परिषदसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निमित्ताने प्रत्येक पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत. हे सर्वजण आपापल्या परीने आपल्या स्तरावर जनतेसमोर जात आहेत. जनतेचे प्रश्न, गऱ्हाणी ऐकत आहेत. मात्र जे कोणत्याच पक्षात नाहीत, कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी नाहीत, कोणत्याही पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केलेला नाही. बीड नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांची मुदत तर केव्हाच संपून गेली आहे. यामुळे नगराध्यक्षांसह एकही नगरसेवक पदावर नाही. गेल्या काही महिन्यांपासून बीड नगर परिषदेचा कारभार प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्या खांद्यावर आहे. या दोघांकडून जर जनतेची कामे झाली नाही तर अशा स्थितीत या दोन्ही अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी जनतेच्या सेवेत आहेतच. या सर्व बाबी संवैधानिक आहेत. परंतु या सर्व संवैधानिक बाबींमध्ये जेव्हापासून बीड नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांची मुदत संपली तेव्हापासून माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर हे असंवैधानिकरीत्या सतत काहीना काही आश्वासनांच्या खैराती करणाऱ्या बाबी प्रसिद्धी माध्यमातून पत्रकपंचीद्वारे मांडत आहेत. जसे शहराला पाच दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार, वास्तविक पाहता डॉ. योगेशच्या या पत्रकपंची नंतर पंधरा दिवस उलटूनही पाच दिवसात तर सोडा १० ते १५ दिवसाच्या आत नळांना पिण्याचे पाणी येत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. जुन्या मोंढ्यातील रस्त्यांचे उर्वरित काम काही दिवसात पूर्ण करणार वगैरे. सध्या बीड नगर परिषदेमध्ये कोणीही पदाधिकारी नाही, कोणत्याही पक्षाची सत्ता नाही. ना कोणी नगराध्यक्ष आहे, ना कोणी नगरसेवक. डॉ. योगेश हे गेल्या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यपदी वडिल नगराध्यक्ष असल्याने विराजमान झाले होते. नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांसह त्यांचाही कालावधी संपून काही महिने झाले आहेत. सध्या तेही इतर पक्षीय नगरसेवकांसारखे माजी झालेले आहेत. तरीसुद्धा त्यांची अशा प्रकारे पत्रकपंची ही असंवैधानिकरीत्या करण्यात येत आहे. त्यांच्या या पत्रकपंचीमुळे इतर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जनतेची कामे करताना अडचणी येत आहेत. या बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी वेळीच याला आळा घालावा व सर्वांनी हे लक्षात घ्यावे की, डॉ. योगेश क्षीरसागर हे संवैधानिकरीत्या जिल्हाधिकारी, प्रशासक किंवा मुख्याधिकारी नाहीत. शिवाय कुठलेही लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी नाहीत म्हणून इतर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी त्यांची ही पत्रकपंची यापुढे खपवून घेतली जाणार नाही. या विरोधात कडक पावले उचलली जातील. असा इशारा एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

 

आश्वासनांची खैरात करत निघालेले नेमके कोणत्या पक्षाचे ?

बीड नगर परिषद च्या आगामी निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून तोंडाची टिमकी वाजवीत आश्वासनांची खैरात करत निघालेले डाॅ. योगेश हे लोकशाहीतील नेमके कोणत्या पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत ? हे अगोदर त्यांनी स्पष्ट करायला हवे. राजकारणात त्यांनी चालविलेली लुडबुड ही असंवैधानिक आहे. ते सध्या तरी कोणत्याच पक्षाचे पदाधिकारी किंवा कोणत्याच पक्षात प्रवेशकर्ते झालेले नाहीत. त्यांच्या मोठ्या काकांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याहस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले असले तरी या डॉ. योगेश चे वडील तथा माजी नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर हे अधिकृतरित्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिवाय डॉ. योगेश पण ना कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहेत ना कार्यकर्ते. मग ते कोणत्या तोंडाने जनतेत फिरून लुडबुड करत आपल्या तोंडाची टिमकी वाजवून आश्वासनांची केलेली खैरात पत्रकपंचीद्वारे प्रसिद्धी माध्यमांतून जनतेसमोर आणत जनतेची दिशाभूल करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित करून जनतेने डॉ. योगेश करत असलेल्या आश्वासनांच्या खैरातीला भूलू नये. या बोल घेवड्याला सूज्ञ जनतेने थारा देऊ नये. असे आवाहनही शफिक भाऊ यांनी केले आहे. 

 

अधिकाऱ्यांनीही दक्ष राहावे !

नगरपरिषद निवडणूक च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्यापासून ते प्रत्येक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. राजकारणात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या हितासाठी निवडणूक काळात व निवडणूक पूर्वी काही ना काही करत राहतात. हे जर संवैधानिकरीत्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत असतील तर ठीक आहे. परंतु असंवैधानिकरित्या लोकशाही पायदळी तुडवत कुठलेही शासकीय-प्रशासकीय अधिकार नसलेल्या व्यक्तीने आपणच शहरात कसे मोठे आहोत आणि आपणच कसे शहराचे वारे-न्यारे करू शकतो असे असंवैधानिकरीत्या दाखविण्याची मोहीम सुरू केली असेल तर त्याला जिल्हाधिकारी, प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी वेळीच पायबंद घालावा. अन्यथा एआयएमआयएम पक्ष यासाठी कडक पावले उचलेल. असा इशाराही शफिक भाऊंनी दिला आहे.

 

मुस्लिम बहुल भागात रस्त्यांवरील मुरमाळ बोळवणी मागे कोण ?

डॉ. योगेश क्षीरसागर हे एखादे अधिकारी किंवा पदाधिकारी असल्यासारखे शहरात आपल्या बगलबच्चांसोबत फिरताना अनेक आश्वासनांची खैरात करत आहेत. मात्र बीड शहरातील मुस्लिम बहुल भाग असलेले मुहम्मदीया कॉलनी, इस्लामपुरा, मोमीनपुरा, आसेफनगर चा मुख्य रस्ता, बालेपीर एरियातील अनेक मुस्लिम बहुल भागात अनेक ठिकाणी रस्ते बनविणे आवश्यक असताना तिथे सर्रासपणे मुरमाळ बोळवण केली जात आहे. यामागेही डॉ. योगेश यांचेच हात आहेत की, त्यांच्या मागे जिल्हा प्रशासनाचा पाठिंबा आहे ? असा प्रश्नही शफिक भाऊंनी उपस्थित केला आहे.

 

 

Sharing

Visitor Counter