पत्रकारितेतील मनस्वी "रईस" गेला !

Beed

पत्रकारितेतील मनस्वी "रईस" गेला !

बीड/वार्ताहर 

सध्याच्या काळात आता पूर्वीसारखी गळ्यात शबनम अडकवून संपूर्ण शहर पादाक्रांत करत पत्रकारिता करायचा काळ राहिला नाही. तो काळ कधीच संपला आहे. आता पत्रकार म्हणजे ना गळ्यात शबनम, ना पायी फिरून मजल दरमजल करत पत्रकारिता करायचे दिवस राहिले. जसे जग गतिमान झाले तसे पत्रकारिताही गतिमान झाली आहे. आता पत्रकारिताही मोटार सायकलवर बसून भराभर क्षणात इथे तर क्षणात तिथे अशी पळापळ करत करावी लागत आहे. या पळापळीच्या धबडग्यात समाजातील रंजल्या-गांजलेल्या, पिचलेल्या, सर्वसामान्यांकरिता केली जाणारी मूळ पत्रकारिता कुठेतरी लोप पावली आहे. अशा या पत्रकारितेच्या काळात खरी व इमाने-इतबारे केलेली पत्रकारिता कशी असते याचे मूर्तीमंत उदाहरण असलेले आणि मला भावासारखे असलेले माझे मित्र पत्रकार रईस खान यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी हार्ट अटॅकने अकाली निधन झाले आणि मला धक्का बसला. त्यांच्या संपर्कात आल्यापासूनचे दिवस माझ्या मनपटलावर एकच गर्दी करू लागले.

मूळचे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याचे रहिवाशी असलेले रईस खान हे शिक्षणासाठी बीड शहरात आले होते. त्यांचे वडील लहान-सहान कामे करून आपला व आपल्या परिवाराचा प्रपंच चालवायचे. धारूर हा बीड जिल्ह्यात असलेला एक अत्यंत दुर्लक्षित व मागास तालुका. तिथे चांगल्या शाळा नसल्याने रईस खान यांची मोठी बहीण ही बीड शहरात दिलेली असल्याने त्याने रईस यांना शिक्षणासाठी धारूरहून आपल्या घरी आणले आणि शिक्षणासाठी त्यांचे नाव शाळेत घातले. रईस यांनीही मोठ्या मेहनतीने व कष्टाने शिक्षण घेतानाच मोबाईल रिचार्ज सेंटरवर सुद्धा काम केले. त्यांच्याकडे तेव्हा एक रेंजर सायकल होती. त्या सायकल वरून ते कॉलेजलाही जायचे आणि मोबाईल रिचार्ज सेंटरच्या दुकानावर ही जायचे. असे करत त्यांनी प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली. शिक्षण घेत असताना त्यांना दुसरा एक छंद लागला तो म्हणजे पत्रकारितेचा. नेहमी धीर गंभीर राहणारे रईस यांनी नेहमी सामाजिक पत्रकारिताच केली. सुरुवातीला बीड शहरातील उर्दू दैनिक तामिर व नंतर हिंदी दैनिक वैचारिक जंग आणि काही वर्षांपासून औरंगाबाद येथून प्रकाशित होणारे उर्दू दैनिक एशिया एक्सप्रेस अशी त्यांची पत्रकारिता सुरू होती. स्वभावाने अत्यंत मितभाषी साधे सरळ राहणीमान व अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेले रईस खान यांनी पत्रकारितेला कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही तर नेहमी सेवा म्हणून पत्रकारिता केली. पत्रकारिता करतानाच शहरातीलच एका महाविद्यालयात प्राध्यापक पदी त्यांची वर्णी लागली. इथे त्यांनी अनेक वर्षे अत्यंत अल्प मानधनात कर्तव्य बजावले. गेल्या अनेक वर्षापासून ते याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते खरे, पण गेल्या तीन वर्षांपूर्वीच त्यांचे अप्रोवल मंजूर झाल्याने त्यांना अल्प मानधना ऐवजी तीन वर्षापासून वीस टक्के वेतन मिळत होते. बीड शहरात भाड्याच्या घरात राहून त्यांचे जीवन चक्र सुरू होते. त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत. पैकी सर्वात मोठी मुलगी इयत्ता अकरावीत, दुसरी मुलगी आठवीत, एक मुलगा सहावी तर सर्वात लहान असलेला मुलगा तिसरीत शिक्षण घेत आहे. त्यांच्या पत्नीही घरप्रपंच सांभाळून डबल एम.ए.बी.एड. झालेल्या आहेत. आई-वडील वयोवृद्ध असून ते धारूर येथेच राहतात. एक लहान भाऊ आहे तोही ऑटो रिक्षा चालून आपले प्रपंच सांभाळतो आहे. तर चार बहिणी आहेत. अशी एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले रईस खान यांना प्रथम जून २०२२ रोजी छातीत दुखू लागल्याने दवाखान्यात भरती करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या वॉलमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. म्हणून त्यांच्यावर २२ जून २०२२ रोजी इंजिओप्लास्टी करण्यात आली होती. यानंतर बरोबर दोन महिन्यांनी २२ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही ते वाचू शकले नाहीत. व २२ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी ०७:३० वाजता त्यांचे निधन झाले. संध्याकाळी ९:०० वाजता त्यांचे पार्थिव इस्लामपुरा भागात असलेल्या बारादरी मस्जिद कब्रस्तान येथे दफ़्न करण्यात आले. अल्लाह त्यांना जन्नत मध्ये जागा देवो व त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना उभे राहण्याची शक्ती देवो. अशी अल्लाहकडे दुवा करतो.

Sharing

Visitor Counter