हर घर झंडा उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर, आस्थापनेवर 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज उभारावा - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
हर घर झंडा उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर, आस्थापनेवर 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज उभारावा - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर झंडा" व "स्वराज्य महोत्सव" उपक्रमांचे आयोजन
बीड/वार्ताहर
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात "हर घर झंडा" हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. बीड जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, विविध आस्थापना, नागरिक या प्रत्येकांने आपल्या घरावर, आस्थापनेवर दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रध्वज उभारावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत "हर घर झेंडा" उपक्रम राबविण्याकरिता आढावा व नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अजीत पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा शल्स चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ज्ञानोबा मोकाटे व उपजिल्हाधिकारी (सामान्य) दयानंद जगताप आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, देशभरात दि. 12 मार्च 2021 ते 15ऑगस्ट 2023 या कालावधीत "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात "हर घर झेंडा" हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. तर राज्य शासनामार्फत दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. "हर घर झेंडा" या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापना तसेच सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज उभारावा. तसेच नागरिकांना त्यांच्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, केंद्रीय गृह विभागाच्या दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल", या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. प्लास्टीक ध्वजाचा वापर होऊ नये, याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी व त्यासाठी सातत्याने जाणिव जागृती निर्माण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील एकूण 1972 स्वस्त भाव धान्य दुकाने व ग्रामपंचायत भवनमध्ये विक्रीसाठी झेंडे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात या उपक्रमाबाबत दवंडी, धार्मिक स्थळावरील भोंगे आदि विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धी करावी. प्रसारमाध्यमांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रभावी व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने यासह निमशासकीय व खाजगी आस्थापना तसेच सहकारी व शैक्षणिक संस्था यासह अन्य विविध शासकीय यंत्रणांनी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार त्यांची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडावी. सी. एस. आर. च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या झेंड्यांच्या वितरणासाठी कार्यक्रम आयोजित करावा.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अजीत पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "हर घर तिरंगा" व "स्वराज्य महोत्सव" यशस्वीपणे साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदे्च्या सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या उपक्रमात सर्वांनी हिरीरीने सहभाग घ्यावा. प्राप्त होणाऱ्या राष्ट्रध्वजांचे मागणीनुसार उपलब्धता व योग्य प्रकारे वितरण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील स्वस्त भाव धान्य दुकानांमध्ये विक्रीसाठी झेंडे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व स्वस्त भाव धान्य दुकानदार यांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ज्ञानोबा मोकाटे व उपजिल्हाधिकारी (सामान्य) दयानंद जगताप यांनी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"अंतर्गत "हर घर तिरंगा" व "स्वराज्य महोत्सव" उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या मागदर्शक सूचना, जिल्हास्तरावर राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.








