महाराजांची नावे घेऊन शहरांची नावे बदलणाऱ्या बेगडी राजकारण्यांच्या फोटोंवर लाथांनी प्रहार !

महाराजांची नावे घेऊन शहरांची नावे बदलणाऱ्या बेगडी राजकारण्यांच्या फोटोंवर लाथांनी प्रहार !
दोन्ही महाराजांबद्दल आमच्या मनात आदर - ॲड. शेख शफीक भाऊ
बीड/प्रतिनिधी
सत्ता सोडण्यापूर्वी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलून या शहरांचे नवीन नामकरण केले. यामुळे एआयएमआयएम पक्षाचे
प्रदेश अध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाड़ा अध्यक्ष फेरोज लाला यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शिवसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या फोटोंना रस्त्यावर येऊन पायदळी तुडवत लाथांनी प्रहार करत काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींसह पंतप्रधानांना याविषयी निवेदन पाठविले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शफीक भाऊ म्हणाले की, आम्ही आमचा पक्ष आणि मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात नाही. ही महान व्यक्तिमत्वे आम्हालाही आदरणीय आहे. आमच्याही मनात त्यांच्या विषयी नितांत आदर आहे. परंतु या थोर पुरुषांची नावे घेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांनी मिळून जे अत्यंत तुच्छ व जातीयवादी राजकारणाला खतपाणी घालणारा निर्णय घेत औरंगाबाद व उस्मानाबाद चे नाव बदलले ते या थोर पुरुषांबद्दल असलेल्या आदराने नाही तर फक्त समाजामध्ये जातीयतेचे विष कालविण्याकरिता सत्तेतून पाय उतार होता-होता करण्यात आलेले एक षडयंत्र आहे. याचे फक्त एआयएमआयएम पक्षच नाही तर देशभरातील सर्व मुस्लिम समाज अत्यंत कठोर शब्दात याची निंदा करतो. तसेच या दोन्ही जिल्ह्याचे नाव हे ऐतिहासिक आहेत. ते नाव कोणी सोम्या गोम्याने ठेवलेली नाहीत. ज्यांची नावे या शहरांना आहेत त्यांनी आपल्या काळात आपले कर्तव्य, कर्तबगारी व जनतेप्रती असलेले आपले उत्तरदायित्व अत्यंत सक्षमपणे सांभाळलेली होती. परंतु या दोन्ही शहरांची नावे फक्त मुस्लिम धर्मातील असल्याने राजकारणातील कट्टरपंथीयांनी स्वतः ची राजकीय पोळी शेकून घेण्याकरिता सत्ता सोडून जाताना हा निर्णय जनतेवर एकतर्फी लादला. याचा एआयएमआयएम पक्ष जाहीर निषेध करतो. तसेच या दोन्ही शहरांची नावे औरंगाबाद व उस्मानाबाद अशीच राहावीत म्हणून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाची मोहीम हाती घेणार आहोत. हा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाच्या माध्यमातून देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे मांडण्यात आला असून यावर जर येत्या काही दिवसात सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही तर एआयएमआयएम पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असे म्हटले.
यावेळी करण्यात आलेल्या निषेध आंदोलनामध्ये उध्दव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजीत पवार, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके, बाळासाहेब आजबे यांच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष शेख मतीन, तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शेख एजाज (खन्ना भैय्या), शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, जिल्हा सचिव अन्वर पाशा, ज्येष्ठ नेते अब्दुस् सलाम सेठ, रिटायर कर्मचारी जिल्हाध्यक्ष शेख वजीर सर, जानी भाई, नवाब भाई, शाहेद कवडगावकर, फसी भाई, युवक शहराध्यक्ष सलमान शेख, सह प्रवक्ता शेख बिलाल, बांधकाम संघटना शहराध्यक्ष सय्यद बासेद भाई, रहेमत पठाण, शेख शाकेर, नईम मेंबर, इलियास बागवान, युवक शहर उपाध्यक्ष जुबेर पठाण, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सोहेल शिकलगार, सोशल मीडिया शहराध्यक्ष जैफ सिद्दीकी, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अबरार बागवान, सोशल मीडिया शहर उपाध्यक्ष आमेर खान, शहर सरचिटणीस सय्यद शारेख, मोमीन सोहेल, शफीक मोमीन, शेख रोहिब जावेद, शेख नदीम, शेख रोहिब, अझहर भाई, बुरहान काझी, मोमीन फसी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








