प्रभाग क्रमांक ११ व १२ मध्ये शेकडो मतदारांची नावे दोन्हीकडे

प्रभाग क्रमांक ११ व १२ मध्ये शेकडो मतदारांची नावे दोन्हीकडे
मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अन्यथा आंदोलन - शेख मोहसीन
बीड/प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक ११ व १२ मधील मतदार याद्यांमध्ये शेकडो मतदारांची नावे दोन्ही यादीत असल्याचे निदर्शनास आल्याने मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय नगरपरिषदांच्या निवडणूका घेण्यात येऊ नये. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली असून जर मतदार यादी मधील हा डबल घोळ दुरुस्त करण्यात आला नाही तर उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अलीकडील काही वर्षांपासून राजकारणात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांपासून मोठमोठ्या नेत्यांपर्यंत आपण व आपल्या पक्षाला निवडणुका जिंकून देण्याकरिता साम-दाम-दंड-भेद चा वापर करत असल्याचे आपण पाहतच आहोत. परंतु आता यापुढेही राजकारणाची मजल गेली असून एकाच मतदाराची नावे आता एकाच मतदार यादीत दोन-दोनदा किंवा एकाच मतदाराची नावे दोन-दोन प्रभागातील याद्यांमध्ये समाविष्ट करण्यापर्यंत मजल गेली असल्याचे दिसून आले आहे. याला राजकारण विरहित जिल्हास्तरावर कर्तव्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच लगाम लावावा अन्यथा राजकारणाचे असे अघोरी कृत्य सुदृढ लोकशाहीला मारक ठरणारे आहे. याचेच उदाहरण सध्या प्रभाग क्रमांक ११ व १२ मधील बीड नगर परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या पाहून दिसून आले आहे. या दोन्ही प्रभागातील मतदार याद्यांमध्ये शेकडो मतदारांची नावे दोन्हीकडे समाविष्ट केलेली आढळून आली असून या प्रभागातील मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय यातील घोळ दुर केल्याशिवाय नगरपरिषद ची निवडणूक घेण्यात येऊ नये. अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा ही सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.








