एस.पी.साहेब वाहतूक पोलिसांचे त्रासदायक नियोजन थांबवून वाहतूक सुरळीत करा - एस.एम.युसूफ़

एस.पी.साहेब वाहतूक पोलिसांचे त्रासदायक नियोजन थांबवून वाहतूक सुरळीत करा - एस.एम.युसूफ़
बीड/प्रतिनिधी
शहरातील शिवाजी चौकात सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे परंतु आज सकाळपासून वाहतूक पोलिसांनी या चौकात लावलेले नियोजन वाहन चालकांना डोकेदुखीचे व त्रासदायक ठरत असून ते थांबवून वाहतूक सुरळीत करावी. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील शिवाजी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. अहेमदनगर रोड, बार्शी रोड व जालना रोड कडे जाणाऱ्या रस्त्यांवर चौकातील काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उरलेल्या मल्टीपर्पज मैदानाच्या बाजूचे काँक्रिटीकरण रात्री करण्यात आले. फक्त तेवढाच भाग रहदारी साठी अजून काही दिवस वापरता येणार नाही परंतु एवढ्या भागात केलेल्या काँक्रिटीकरणामुळे बशीरगंज कडून येऊन अहेमदनगर रोड व जालना रोड ला जाणाऱ्या वाहनांना या भागाकडील काँक्रिटीकरण पूर्ण होऊन व तेथून वाहने जाऊ देण्यात कोणतीही समस्या नसतानाही वाहतूक पोलीस बशीरगंज कडून जालना रोड व अहेमदनगर रोड कडे जाणाऱ्या वाहनांना बार्शी रोड कडे पाठवीत आहेत. बार्शी रोड वरून आलेल्या व जालना रोड कडे जाणाऱ्या वाहनांना अहेमदनगर रोड कडे पाठविले जात आहे. यामुळे बार्शी रोड व अहेमदनगर रोड वर वाहनांची गर्दी तर वाढत आहेच परंतु कारण नसताना वाहतूक पोलीस वाहनांना लांबचा वळसा घेऊन मार्गकर्मण करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे जास्तीच्या लागणाऱ्या वेळेसह जास्तीचे इंधन ही लागत असल्याने वाहन चालकांमध्ये या नियोजनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तरी आपण या चुकीच्या नियोजनाची नोंद घेत शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी वाहन चालकांना या रोडवरून त्या रोडवर त्या रोडवरून या रोडवर असे हेलपाटे मारावे लागू नये म्हणून येथील वाहतूक पोलिसांनी चालविलेले चुकीचे नियोजन थांबवावे आणि वाहतूक सुरळीत करावी. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.








