प्रभाग क्रमांक 06 मधील घाणीच्या साम्राज्याची दखल नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी-गोपीनाथ देशपांडे

प्रभाग क्रमांक 06 मधील घाणीच्या साम्राज्याची दखल नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी-गोपीनाथ देशपांडे.
शहर स्वच्छतेबाबत नगरपालिकेने आग्रही भूमिका घ्यावी,अन्यथा शिवसंग्रामच्या रोषास तयार राहावे..
बीड/वार्ताहर
बीड शहरातील अनेक भागात नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक नगरपालिका स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत आहे.पावसाळ्यापूर्वी शहरातील करावयाची कामे पूर्णत्वास न गेल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या तुडुंब भरलेल्या दिसून येत आहेत.नालीतील कचरा रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे येत्या काळात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्याचे काम प्राधान्याने होत आहे.पूर्वीचा प्रभाग क्रमांक 07 व आत्ताचा प्रभाग क्रमांक 06 मध्ये रहिवाशांनी वारंवार नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार देऊनही वाहतुकीच्या रस्त्यावरील केर कचऱ्याचे नियोजन करता आलेले नाही.नगरपालिका स्वच्छता विभागाकडून या ठिकाणी नियमित स्वच्छता करण्यात येत नाही, नागरिकांनी समस्या सांगण्यास सुरुवात केल्यास उडवाउडवीचे उत्तर देऊन निघून जातात.या ठिकाणी भररस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.या भागातील रहिवाशांना दुर्गांधीचा अतोनात त्रास होत आहे
माजी मंत्री तथा शिवसेना नेते खुद्द जयदत्त क्षीरसागर यांना देखील नगरपालिका प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेचा अनुभव आला.मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी त्यांनी भेट दिली असता समोर रस्त्यावर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्या बाबत नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाा देऊनही यावर अद्याप कुठलीच कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही.या भागातील एका खाजगी इसमाने बांधकामाचे साहित्य भररस्त्यावर मांडले आहे.वेळोवेळी त्यालाही नागरिकांनी विनवणी केली, परंतु तोही ऐकत नाही.त्यामुळे या ठिकाणचे रहिवासी वैतागले असून नगरपालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक 06 मधील अडचणी व समस्या दूर कराव्यात.अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे शिवसंग्रामचे शहर सचिव गोपीनाथ देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.








