महाराष्ट्रासारखा भक्तीभाव आणि आनंद कोठेच नाही - रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक

महाराष्ट्रासारखा भक्तीभाव आणि आनंद कोठेच नाही - रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक
माय कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चाकरवाडीचे माऊली महाराज!
बीड / प्रतिनिधी
महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर देवाच्या दर्शनालाही पैसे मोजावे लागतात परंतु देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येतं ते पंढरीच्या विठूरायाच. महाराष्ट्र सारखा भक्ती भाव आणि आनंद इतर कोणत्याही प्रांतात पहावयास मिळत नाही. भारत सोडला तर परदेशात पहावयास मिळत नाही, मृत्युलोक सोडला तर स्वर्गातही पहावयास मिळत नाही आणि वैकुंठातही नाही. असा भक्ती भाव आणि आनंद आपल्या महाराष्ट्रात पहावयास मिळतो. माय कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण साखरवाडीचे माऊली महाराज असून आपल्या असंख्य भक्तांना आईची माया देणारे माऊली महाराज सदोदित आपल्या सोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद, त्यांची पुण्याई आपल्या सोबत असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी केले.
७ जून पासुन माऊलींच्या पावन समाधीस्थळी भव्यदिव्य मंडपात माऊलींच्या वारकरी भक्ततांना अनोख्या सुमधूर भजनाची मेजवाणी लाभली. आपले देहभान विसरून आलेला प्रत्येक भक्त दोन्ही हातांनी टाळी आणि मुखाने राम नामाचा, माऊलींचा, हनुमंतांचा जयजयकार करीत नामसागरात भक्तीप्रेमाने बुडून गेला होता. मंगळवार दिनांक १४ जून रोजी महान संत गुरुवर्य ह. भ. प. माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या या अखंड सप्ताहाचा समारोप रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला. याप्रसंगी ह.भ.प. गुरूवर्य श्री महादेव महाराज तात्या आणि श्री नारायण भाऊ यांनी सर्वप्रथम ढोक महाराजांचे स्वागत केले.
भाविक भक्तांचा जल्लोष, कीर्तनात वाजणारे टाळ, मृदुंग यांचा ठेका आणि माऊलींच्या भक्तिरसाने न्हाहून निघालेला चाकरवाडीचा संपूर्ण परिसर अध्यात्माची खरी ओळख महाराष्ट्राला करून देत होता.
याप्रसंगी बोलताना रामायणाचार्य ढोक महाराज म्हणाले की, जो पुण्याचा संचय करतो त्याची पुण्यतिथी होते, पाप करणाऱ्याची नाही. दुसऱ्याला त्रास देणे पाप आहे तर परोपकार करणे म्हणजे पुण्य आहे. माऊली महाराजांनी आपल्या पूर्ण हयातीत परोपकाराची भावना ठेवून प्रपंचातून परमार्थ कसा साधावा याची शिकवण अवघ्या मानवजातीला दिली आहे. मौलीन बद्दल बोलायचे म्हणले तर एकच म्हणावे लागेल माय कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माऊली आहेत. ज्याला सगळे टाकून देतात... त्याचा सांभाळ माऊली करतात. "जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तेथेची देव ओळखावा तोचि साधू जाणावा" या उक्तीस माऊली महाराजांचे जीवन सफल ठरते. मोठ मोठ्या नेत्यांना गर्दी जमा करावी लागते परंतु काहीही न करता संत महात्म्यांच्या जवळ लोकांची गर्दी आपोआप जमा होते. जिथे मागून मिळते ते आश्वासन आणि जिथे न मागता सर्व काही मिळते तो आशीर्वाद. नेतेमंडळी आश्वासन देतात आणि साधुसंत आशीर्वाद देतात. त्यामुळे साधुसंतांच्या आश्रयास लाखो भाविकभक्त जमा होतात. आज या ज्ञानमंडपात जमा झालेला हा लाखोंचा जनसमुदाय माऊली महाराजांच्या मातृत्वाचे प्रतीक आहे.
गेल्या दोन वर्षापासून हा भक्तीचा सोहळा खंडित झाला होता. कोरोना महामारीचा दोन वर्षांचा हा कालखंड सर्वांनाच अवघड गेला. सर्वसामान्यांबरोबरच वारकरी संप्रदायातले अनेक हिरे आपल्याला सोडून गेले. खूपच बिकट अवस्था झाली होती. मात्र माऊलींच्या कृपेने दोन वर्षानंतर आज आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित आलो आहोत.
संत महात्म्यांचे हृदय हिमालयापेक्षाही खूप संवेदनशील असते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर हिमालयाचा बर्फ वितळतो मात्र दुसऱ्याचं दुःख पाहून विघळणारे हृदय साधुसंतांचा असते. असेच हृदय माऊली महाराजांकडे होते. त्यामुळे त्यांनी कोणताही दुजाभाव न करता सर्वच भक्तांवर आईसारखे प्रेम केले. या भूतलावरील प्रत्येक मानवाने कृष्णाचे स्मरण करून रामाचे आचरण केले तर या मृत्युलोकातच खरा स्वर्ग असल्याचे लक्षात येईल असेही रामायणाचार्य ढोक महाराज यांनी सांगितले.








