तरुणाच्या गूढ-मृत्यु प्रकरणी गृहसचिव, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक आदींना खंडपीठाचे नोटीस

तरुणाच्या गूढ-मृत्यु प्रकरणी गृहसचिव, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक आदींना खंडपीठाचे नोटीस
औरंगाबाद/वार्ताहर
हिंगोली येथील 26 वर्षीय तरुणाच्या गूढ मृत्यु प्रकरणी दाखल फौजदारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती भारत पी. देशपांडे यांनी प्रतिवादीं राज्याचे गृहसचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, पोलिस अधिक्षक, हिंगोली आदींना नोटीस देत याचिकेतील आरोपांविषयी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
याप्रकरणी हिंगोली येथील मस्तानशाहनगरचे राहिवाशी पठाण इस्माईलखान यांनी ॲड. सईद एस. शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केलेली आहे.
दाखल याचिकेप्रमाणे याचिकाकर्ताचा विवाहित मुलगा इरफानखान यास दिनांक 30.09.2021 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारे 1. भरत पि. शंकर यादव, 2. रोहित पि. राजु यादव, 3. सोमनाथ उर्फ अक्षय पि. अशोक चंदनशिव आणि 4. विठ्ठल पि. विष्णु चंदनशिव यांनी पार्टी करण्यासाठी घेवून गेले. मात्र इरफान घरी परतला नसल्यामुळे दिनांक 01.10.2021 रोजी याचिकार्त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.
दिनांक 02.10.2021 रोजी हिंगोली पासून 20 किलामिटर लांब सोडेगाव / सालेगाव भागात कायाधु नदीमध्ये इरफानचा अर्धनग्न मृतदेह विविध जखमांसह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. तेव्हांपासून याचिकाकर्ता हे पोलिसांना तोंडी आणि लेखी तक्रार करून वरनमुद संबंधित व त्यांच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती करीत आहे. मात्र राजकीय दबावापोटी आरोपींना वाचविण्याकरिता पोलिस गुन्हे दाखल न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.
सदरील प्रकरणावर सुनावणीनंतर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत सहाय्यक सरकारी वकीलांना याचिकेतील आरोपांविषयी खुलासा करण्यासाठी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले. प्रकरणाची पुढील सुनावणी दि. 11.07.2022 रोजी ठेवली आहे.
याप्रकरणी याचिकाकर्ताच्या वतीने अॅड. सईद एस. शेख यांनी काम पाहिले. तर शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी बाजु मांडली.








