केजमध्ये लक्कीड्राॅचा माहा घोटाळा! 

Beed

केजमध्ये लक्कीड्राॅचा माहा घोटाळा! 

केज/प्रतिनिधी 

इमू , केबीसीसारख्या दामदुप्पट योजनांमधून गडगंज पैसा कमावून आयोजक फरार झाले . त्यानंतर वर्ष , दोन वर्ष शांतता होती . मात्र , पुन्हा इझी मनीच्या स्कीमनी डोके वर काढले आहे . आयोजकांना सर्वात सुरक्षित आणि राजरोस पैसे मिळवून देणाऱ्या लकी ड्रॉ स्कीमनी जिल्हाभर उच्छाद मांडला आहे . एक हजार ते पाच हजारांच्या पटीत गुंतवणूक असलेल्या या योजनांमधून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली जात आहे . महागड्या बक्षिसांच्या हव्यासापोटी अशा योजनांना केज तालूक्यातील गावे सध्या सर्वाधिक बळी पडत आहेत . स्वतःच्या फायद्यासाठी शिवजयंती निमित्त लक्की ड्रॉचे आयोजन करुन चार चाकी वाहनासह इतर बक्षीसांचे अमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी साई एंटर प्रायजेसच्या चार ठगा विरुद्ध सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . केज येथे साई एंटरप्राजेस नावाखाली शिवजयंती निमित्त अमोल गालफाडे , शिवराज मुथळे , राहुल शेवाळे व राहुल औसेकर या चौघांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना आमिष दाखवून १ हजार ५०० रु . प्रमाणे तिकीटे / कार्ड छापून त्याची विक्री केली . त्यातून भाग्यवान विजेत्याना स्कॉपीओ , स्विफ्ट , बुलेट मोटार सायकल , टीव्ही , फ्रिज आणि इतर बक्षिसे दिली जाण्याचे आमिष दाखविले . तसेच त्यांनी १ ९ फेब्रुवारी रोजी सोडत काढण्याचे घोषीत करुन त्यात पुन्हा बदल केला . काढलेल्या सोडतीतीचे व्हिडीओ चित्रीकरण केले आणि ते एका यु - ट्यूब वर प्रसारीत करुन लागलीच हटविले . या प्रकरणी केज येथील पत्रकार साजेद इनामदार यांना त्यांची स्वतःची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी थेट ही बाब सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना भेटून सर्व हकीकत कथन केली . त्या नंतर पंकज कुमावत आणि शंकर वाघमोडे यांच्या आदेशा वरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी प्राथमिक चौकशी करून प्रकरणाची शहानिशा केली . त्यांनी सर्व माहिती वरिष्ठांना सादर केल्या नंतर त्यांच्या आदेशाने दि . १० जून शुक्रवार रोजी केज पोलीस ठाण्यात अमोल गालफाडे , शिवराज मुथळे , राहुल शेवाळे आणि राहुल औसेकर या चौघांच्या विरुद्ध पत्रकार साजे इनामदार यांच्या तक्रारी वरून ठाणे अंमलदार रुक्मिण पाचपिंडे यांनी गु . र . नं . २३३/२०२२ भा . दं . वि . ४२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत . इमू , केबीसी , फिनिक्स इन्फ्रा , कल्पतरू , पर्ल गुंतवणूक कंपन्या असल्यामुळे त्यांनी केलेल्या फसवणुकीतून गुन्हे दाखल झाले आणि तपास सुरू झाला . यातूनच मग इझी मनीचा हव्यास असणाऱ्यांनी लकी ड्रॉसारख्या स्कीमकडे सध्या मोर्चा वळवला आहे . प्रत्येक गावातील चार - पाच तरुण हाताशी धरायचे . त्यांच्या माध्यमातून एखादी संस्था रजिस्टर करायची आणि स्कीम सुरू करायची . कित्येक संस्था तर रजिस्टरही केलेल्या नाहीत . मात्र तरीही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे . यासाठी एजंटही नेमले जातात . एजंट लोकांना घसघशीत कमिशन असल्यामुळे ते दिवसरात्र सभासद गोळा करत हिंडतात . सध्या अगदी एक हजार ते पाच हजार रुपयांच्या पटीत रक्कम गुंतवून लकी ड्रॉ स्कीम सुरू करण्यात आल्या आहेत . यात महागड्या कार , मोटारसायकल , टीव्ही , फ्रीजपासून घरात लागणाऱ्या विविध वस्तूंचे आमीष दाखवले जाते . अर्थात लकी ड्रॉ काढला जातो आणि त्यातून या वस्तू दिल्याही जातात . त्यासाठी गावात मोठा स्क्रिन लावला जाऊन मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे काढली जातात . पण तरीही ही बक्षिसे काढण्यामध्येही घोळ केला जातो , हेही उघड आहे . पाच हजार सभासद असतील , तर लकी ड्रॉसाठी टाकण्यात आलेल्या चिठ्या किंवा त्यासाठीचे कॉइन्स पाच हजार आहेत की नाही , हे कोणीच मोजत नाही . त्यामुळे बक्षिसासाठी सर्वांचा विचार केला जात नाही , हे उघडच आहे .

Sharing

Visitor Counter