मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महामहिम राष्ट्रपतींना

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महामहिम राष्ट्रपतींना
स्वयंसहाय्य महिला बचतगटातून २० हजार विनंती पत्र पाठविण्यात आले
बीड/वार्ताहर
महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम ) च्या मा. ज्योतीताई ठाकरे (अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा) यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासाठी महामहिम राष्ट्रपतींना बीड जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचतगटातून २० हजार विनंती पत्र पाठविण्यात आले.
मराठी भाषा हि अतिप्राचीन भाषा आहे. हे अनेक पुरावे व संशोधनातून सिद्ध झाले आहे. गेल्या १५०० वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेचा इतिहास आहे, हे ऐतिहासिक ग्रंथ, संत साहित्य, ताम्रपट, गाथा, शिलालेख, राजाज्ञा इत्यादीतून सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्र राज्याप्रमाणे इतर राज्यात व जगात मराठी बोलणारे करोडो मराठी भाषिक आहेत. त्यानुसार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे रीतसर प्रस्ताव महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला न्याय मिळत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक व रोजगार निर्मितीच्या संधी यामध्ये भर पडण्यास मदत होणार आहे. याकरिता शासन व साहित्यिक मार्फत पाठपुरावा होत आहे. या पाठपुराव्यामध्ये आता महिला बचतगटामार्फत प्रयत्न होत आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय हे महिलांचे व आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक सक्षमीकरण तर करतेच शिवाय समाजातील, राज्यातील व देशातील ज्वलंत प्रश्न सोडविणे व अत्यावश्यक उपाययोजना करिता जनजागृती करण्याचे काम करते. त्यानुसारच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी बीड जिल्ह्यात करण्यात आली. यासाठी माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी एस. बी. चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. तसेच बीड जिल्ह्यातील बचतगटाच्या सुमारे २० हजार पेक्षा जास्त महिला मार्फत मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासाठी महामहिम राष्ट्रपतींना बीड जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचतगटातून २० हजार विनंती पत्र पाठविण्यात आले.
याकरिता माविमचे लेखाधिकारी सी. आर. मुंजेवार, जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे व्यवस्थापक उषा राठोड, वैशाली नाईकनवरे, सविता औटे, मिना कांबळे, रामकुंवर आंधळे, बेबी शिंदे , सर्व माविम सहयोगिनी, सी.आर.पी. कार्यकारिणी व बचतगटाच्या महिलांनी प्रयत्न केले.








