माजी नगराध्यक्ष रणजीतसिंह चौव्हाण यांच्या निधनाने शहरात शोककळा

माजी नगराध्यक्ष रणजीतसिंह चौव्हाण यांच्या निधनाने शहरात शोककळा
बीड/प्रतिनिधी
शहरातील पेठ बीड भागातील रहिवाशी असलेले बीडचे माजी नगराध्यक्ष रणजीतसिंह चौव्हाण यांचे पुणे येथे उपचार चालू असतांना सोमवारी रात्री १० वाजून २२ मिनीटांनी निधन झाले . मृत्युसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते . रणजीतसिंह चौव्हाण यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , सून , नातवंडे , एक मुलगी , जावई असा परिवार आहे . दीर्घ काळ ते बीड नगर पालिकेचे सदस्य होते . सामाजिक कार्यात नेहमी त्यांचा पुढाकार असायचा . बीड शहरातील खंडेश्वरी , कंकालेश्वर संस्थानचे ते ८ अध्यक्ष होते . गेल्या ८ ते १० दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते . उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची प्रकृती आणखीच खालावली . सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली . रणजीतसिंह चौव्हाण यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि .२२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मोंढा भागातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . चौव्हाण कुटूंबीयांच्या दु : खात बीड प्रसार परिवार सहभागी आहे .








