आम्ही शिवबाचे मावळे;साजरी करतो एक सर्कल एक शिवजयंती !

आम्ही शिवबाचे मावळे;साजरी करतो एक सर्कल एक शिवजयंती !
कौतुकास्पद : आगर नांदूरला भेट दिली सव्वालाखांची शिवमूर्ती;
रेवकी-देवकी सर्कलमध्ये बी.एम.प्रतिष्ठानचा आदर्शवत उपक्रम
बीड / प्रतिनिधी
आम्ही शिवबाचे मावळे, साजरी करतो एक सर्कल एक शिवजयंती, असे म्हणत बी.एम.प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी सर्कलमधील आगार नांदूर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या पुढाकारातून साजरा झालेला हा शिवजन्मोत्सव खरोखरच आदर्शवत आहे. दरवर्षी एका गावाला सोडत पद्धतीने शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन जयंती साजरी करण्याचा हा उपक्रम समतेची बीजे पेरणारा आहे. आगामी काळातही विविध उपक्रम राबवून माणूसकीचे मानवतावादी कार्य अविरतपणे जोपासले जाईल अशी पावले बाळासाहेब मस्के यांनी उचलली आहेत. एवढेच काय तर त्या दिशेने ते मार्गस्थही झाले आहेत. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एक सृजनशील समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. कारण ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो आहोत, त्या समाजाचे आपण देणेकरी असतो. म्हणून त्यांचे दुःख, वेदना, अडीअडचणी समजून घेत त्यांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे असते. हाच मानवतावादी दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून बी.एम. प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के समाजहिताचे आदर्शवत काम करत आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक सर्कल एक शिवजयंती हा सामाजिक उपक्रम राबवित आहेत. एवढेच नाही तर सोडत पद्धतीने ज्या गावाची चिट्टी निघेल त्या गावाला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देवून त्याच ठिकाणी शिवजयंती साजरी करत आलेले आहेत. गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी आगार नांदूर या गावाची यंदा चिट्टी निघाली आहे. त्यामुळे त्या गावाला शिवाजी महाराज यांची १ लाख २५ हजारांची मूर्ती देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला बी.एम.प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवित आलेले आहे. कोरोनासारख्या कठीण काळात अनेकांना विविध स्वरूपाची मदत तसेच जगण्यासाठीचे किराणा साहित्य असेल अथवा दैनंदिन भाजीपाला असेल आदी मदत थेट पोहचविण्याचे काम बी.एम.प्रतिष्ठानने केलेले आहे. आगर नांदूर येथील शिवजन्मोत्सवात बी.एम.प्रतिष्ठानचे सदस्य आणि ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
1 लाख 25 हजारांची मूर्ती भेट : बाळासाहेब मस्के
रेवकी-देवकी सर्कलमध्ये बी.एम. प्रतिष्ठान प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित आले आहे. यावर्षी सर्कलमधील आगार नांदूरला छत्रपती शिवाजी महाराज यांची 1 लाख 25 हजारांची मूर्ती भेट देऊन शिवजयंती साजरी केली आहे. सतत काही ना काही सामाजिक उपक्रम राबवून माणसे जोडण्याचे काम बी.एम.प्रतिष्ठान करत आलेले आहे. असे मनोगत बी.एम.प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी व्यक्त केले.








