दहा हजार भाविकांच्या साक्षीने खडकीघाटमध्ये महायज्ञाची सांगता संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांची विशेष उपस्थिती

दहा हजार भाविकांच्या साक्षीने खडकीघाटमध्ये महायज्ञाची सांगता संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांची विशेष उपस्थिती
बीड/प्रतिनिधी
तालुक्यातील खडकीघाट येथे सात दिवस चाललेल्या अंगिरस द्विरात्र महासोमयाग (महायज्ञ) पर्वाची सांगता शुक्रवारी झाली. खडकीघाट येथील तलावात झालेल्या अवभ्रत स्नानानंतर दहा हजार भाविकांचा महाभोज संपन्न झाला. या अद्वितीय, अलौकीक आणि अविस्मरणीय सोहळ्यामुळे खडकीघाटची भूमी पावन झाली आहे.
भगवद्भक्ती आणि सद्गुरुभक्तीचा पवित्र संगम असलेल्या बीड तालुक्यातील श्री क्षेत्र खडकीघाट येथे सात दिवसीय महायज्ञ आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सद्गुरु सेलुकर महाराजांच्या कृपाशिर्वादाने बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वरजी सेलूकर यांच्या शुभहस्ते अंगिरस द्विरात्र महासोमयाग पर्व 12 ते 18 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. या पर्वात 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी अहोरात्र यज्ञ प्रज्वलीत होता. याशिवाय विठ्ठल रुक्मिणी आणि खंडोबा मूर्ती तसेच मल्लिकार्जुन मंदिर कलशारोहण सोहळा 14 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यासह ब्रह्मचारी व मुंजाबा देवता प्राणप्रतिष्ठादेखील संपन्न झाली.
खडकीमध्ये सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. ‘याजसाठी केला होता अट्टहास’ असं म्हणावं इतकी भव्य सांगता शुक्रवारी (दि.18) या सोहळ्याची झाली. तत्पूर्वी गुरुवारी श्रीसुक्ताचा देखणा सोहळा संपन्न झाला. यावेळी झालेल्या महाआहोतीमध्ये चरुचा प्रसाद हजारो भाविकांना वितरीत करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी सांगता समारोहासाठी श्रीक्षेत्र खडकीमध्ये साधारण दहा हजार भाविकांची उपस्थिती होती. सुरुवातीला सकाळी 10 वाजता अवभ्रत स्नानासाठी समारोप यात्रा निघाली. यामध्ये बाईक रॅलीत शेकडो तरुण सहभागी झाले होती. त्यामागोमाग बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर महाराजांचा ताफा, त्यापाठी महिलावृंद, त्यानंतर विविध गावांतून आलेली पन्नास ते साठ वाहने; अशी तीन ते साडेतीन किलोमीटरची भव्य शोभायात्रा निघाली. ही समारोप यात्रा खडकीघाटच्या तलावाला वळसा मारून सावरगावमार्गे तलावाच्या सांडवा क्षेत्रात आली. इथे महासोमयागचे अवभ्रत स्नान झाले. यावेळी यज्ञेश्वरजी सेलूकर महाराज, ऋत्विक महाराज, ब्रह्मवृंद आणि समस्त गावकर्यांनी तलावात स्नान केले. तद्नंतर ही समारोप यात्रा यज्ञस्थळी परतली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चोख नियोजन, उत्कृष्ट प्रसाद आणि उत्साही स्वयंसेवक यामुळे समारोप सोहळ्याला चांगलीच रंगत आली.
शंकराचार्यांचे आशीर्वाद
खडकीघाट येथील महासोमयागला संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी सदिच्छा भेट दिला. यावेळी त्यांनी बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वरजी सेलूकर महाराजांचा सन्मान केला. महान तपस्वी आणि साधूसंतांचे पाय खडकीच्या भूमिला लागल्याने सर्वांचाच उर अभिमानाने भरुन आला. सात दिवस खडकी गाव धार्मिक उत्सवात रममान झाला होता. खडकी परिसरातील गावकर्यांनी आणि गावाशी नाळ कायम असलेल्यांनी जुन्या गावकर्यांनी सातही दिवस महायज्ञाला उपस्थिती लावली.
