'त्या'कोरोना संशयित युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह - डॉ थोरात. 

Ashti

आष्टी/तुकाराम गणगे 
बीड प्रसार न्युज

 तालुक्यातील बीडसांगवी येथील युवक कोरोना संशयित असल्याच्या वृत्ताने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.  बीडसांगवी येथील हा युवक ऑनलाईन सेवा पुरविण्याऱ्या एका कंपनीत कामास आहे. तीन दिवसांपूर्वी जामखेड येथे सापडलेल्या रुग्णांत या कंपनीतील एका युवकास कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  कोरोना बाधित रुग्णाने ह्या 'संशयित' युवकाची माहिती अहमदनगर आरोग्य विभागास दिली होती. 
बीड जिल्हा प्रशासनास माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी दुपारी या संशयित युवकास तपासणीसाठी बीड येथे नेण्यात आले होते. या संशयित रुग्णाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट आरोग्य विभागास शुक्रवारी संध्याकाळी प्राप्त झाले. या संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोणीही कोरोना बाधित नाही अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे.
बीडसांगवी येथील हा युवक लोकडॉऊन जाहीर झाल्यानंतर जामखेड येथील नोकरी सोडून गावी आला होता. तो जवळपास एक महिन्यापासून घरी आहे. ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात ह्या युवकास कोणतेही लक्षणे आढळून आलेली नव्हती. 
आरोग्य विभागाच्या वतीने या संशयित युवकास ताब्यात घेतल्याची माहिती सर्वदूर झाल्याने कोरोनाच्या भितीने सर्वजण भयभीत झाले होते, मात्र रिपोर्ट नेगिटिव आल्याने तणाव निवळला आहे अशी माहिती सरपंच माणिक नरोडे यांनी दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन सरपंच नरोडे यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter