तबलीगी जमात विषयी विष पसरवणार्या मीडियाचा निषेध - माजी आ. सुनील धांडे

जातीय रंग देवू नका ; एकजुटीने मुकाबला करण्याचे आवाहन
बीड । प्रतिनिधी
दिल्लीतील निजामुद्दीन मरकज प्रकरणावरून इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही लोक जाणीवपूर्वक तबलीग जमतला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तबलीगच्या माध्यमातून जमात समाज सुधारकाचे काम करते अशा वेळी कोरोनाच्या आडून तबलीग जमात विषयी विष पसरवणार्या मीडियाचा निषेध करण्यात येत असल्याचे संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी आ. सुनील धांडे यांनी म्हटले आहे.
देशात सर्वत्र कोरोनाच्या विषाणूचा उद्रेक होऊ लागला आहे.दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. अशावेळी जात , धर्म विसरून सर्वांनी एकजुटीने जीवघेण्या विषाणूशी लढा देणे आवश्यक आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियावर दिल्लीतील मरकज प्रकरण ज्या पद्धतीने रंगविले जात आहे. ते अत्यंत चुकीचे आणि सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. तबलीग जमातला बदनाम करण्याच्या उद्देशाने तशी प्रतिमा मुस्लिम समाजाची निर्माण केली जात आहे. आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करून समाज सुधारण्याचे काम करणार्या जमातला जातीय द्वेषातून टार्गेट केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तबलीग जमात विषयी मोठे गैरसमज पसरविले जात असून हे अतिशय निंदनीय आहे. कोरोनाला कोणतीही जात , धर्म नाही किंवा कोणता रंगही नाही. अशावेळी इलेक्ट्रॉनिक मिडियानेही देशातील एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल असे न करता अखंड मानवजातीला कोरोनाच्या विषाणूपासून कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे माजी आ. सुनील धांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
