तलवाडयात पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून प्रितम गर्जे या तरूणाने राबविला अनोखा उपक्रम

तलवाडा दि.१० ( प्रतिनिधी ) :- सध्या जगभरात तसेच देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लाॅकडाऊन घोषित केल्याने लोकांना घरातच बसावे लागत असल्याने हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना उपासमारीची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत देण्याचे काम जोमाने सुरू आहे. शासन व प्रशासन जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन आपले योगदान देत आहे. या कार्यात शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांनाही जीव धोक्यात घालून जनतेच्या हितासाठी काम करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील पत्रकारांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काहीतरी मदत केली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तरूण सामाजिक कार्यकर्ते प्रितम गहिनीनाथ गर्जे यांनी शुक्रवारी तलवाडा येथील १४ पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. प्रितम गर्जे या तरूणाने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. प्रितम गहिनीनाथ गर्जे रा. विठठलनगर ( चव्हाणवाडी ) या तरूण युवकाने गेल्या आठवड्यात स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विठठलनगर, शिवाजीनगर, चव्हाणवाडी तसेच तलवाडा येथील जवळपास २५० गोरगरीब व निराधार कुटुंबातील लोकांना किराणा सामानाचे वाटप करून संकटकाळात त्यांना आधार देण्याचे काम देखील केलेले आहे. या तरूण युवकाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन वंचित घटकांना मदत करून आधार दिला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना संकटकाळात आपण मदत केली पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तलवाडा येथील चौदा पत्रकार बांधवांना शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक नवीन आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. त्यांनी राबविलेल्या या स्तुत्य व अनोख्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.








