बीडसांगवी ग्रा.पं.च्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी

Ashti

#बीडसांगवी ग्रा.पं.च्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी

आष्टी/तुकाराम गणगे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बीडसांगवी, गणगेवाडी, कणसेवाडी, गुंडेवाडी या गृप ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच माणिक नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन या जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. ज्या ठिकाणी नागरिक गर्दी करतात तसेच गावातील प्रमुख चौकात,गल्ली बोळात ही फवारणी करण्यात आली आहे. यामुळे कोरोना विषाणू व इतर जंतूंचा संसर्ग टाळण्यास फायदा होणार आहे. स्वतः सरपंच माणिक नरोडे, उपसरपंच विजय डुकरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्रीहरी पुरी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ही फवारणी केली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सोडिअम हायपोक्लोराइड सोल्युशन या जंतुनाशक औषध फवारणीमुळे कोरोना विषाणू सोबतच साथरोग कमी होण्यास मदत होईल. सामाजिक अंतर राखण्यासाठी गावातील किराणा दुकानांसमोर ग्रामपंचायतच्या वतीने चुना पावडर टाकून एक मीटर अंतरावर मार्कआऊट करुन दिले आहे. जेणेकरून अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करणार नाहीत.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गृप ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये नागरिकांनी रस्त्यांवर फिरू नाही, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, हात हँडवॉश किंवा साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना,खोकताना हातरुमाल वापरावे, नाक - तोंड झाकण्यासाठी मास्क किंवा रुमाल यांचा वापरणे, संचारबंदीचे काटेकोर पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पुणे - मुंबई व इतर ठिकाणांहून आलेल्यांची नावे आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायतला कळवावे असे आवाहन सरपंच माणिक नरोडे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी व जनजागृती करण्यासाठी सरपंच माणिक नरोडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Sharing

Visitor Counter